Pimpri News: केंद्राने आरोग्य साहित्य, औषधसाठा उपलब्ध करावा – गोविंद घोळवे

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र राबत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयातील डॉक्टर्स आणि त्यांच्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार पीपीई किट, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज आदी आरोग्य विषयक साहित्य तसेच रुग्णासाठी व्हेंटीलेटर्स आणि औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावा. केंद्र  सरकारने आरोग्य साहित्य त्वरित पुरवावीत, अशी मागणी शिवसेना राज्यसंघटक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी केली आहे.

केंद्रीय  आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची गोविंद घोळवे यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी ही मागणी केली. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या किंचित  प्रमाणात घटत आहे. राज्य सरकारने वैद्यकीय सुविधा वाढवल्या असून पुरवठ्यानुसार लसीकरण करण्यात येत आहे. रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी राज्य शासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. महाराष्ट्राला व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारी आहोत. तथापि, यातील बहुतांश व्हेंटीलेटर नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करावी. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपुर्वी व्हेंटिलेटरची दुरुस्ती करण्यात यावी. सदोष यंत्राचा वापर करणे धोकादायक आहे, याकडे घोळवे यांनी लक्ष वेधले.

कोरानाच्या दोन लाटांचा पुर्वानुभव लक्षात घेता केंद्र सरकारने खबरदारी बाळगावी.  पीपीई किट, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज आदी आरोग्य विषयक साहित्य तसेच रुग्णासाठी औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा, यासाठी आतापासूनच दक्षता घ्यावी. प्राणवायूची कमतरता भासू नये, यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा. महाराष्ट्राला अधिकाधिक वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध करुन द्यावा, अशी वितंनीही घोळवे यांनी केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.