Pimpri News: आगामी महापालिका निवडणुकीत नागरिक शिवसेनेला साथ देतील – गौतम चाबुकस्वार

महापालिका 'मिशन 2020 अंतर्गत' पिंपरीत बैठक

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाची आहे. शहरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपची महापालिकेतील सत्ता अनुभवली, पाहिली आहे. या कालावधीत जनतेच्या पदरात काहीच पडले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असून आत्ता तर त्यामध्ये वाढच झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शहरातील नागरिक नक्कीच शिवसेनेला साथ देतील, अशा विश्वास पिंपरीचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी व्यक्त केला.

तसेच शिवसैनिकांनी एक दिलाने कामाला लागावे. शिवसेनेचा विचार जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर‘शिवसेनेचे मिशन 2022′ अभियान सुरु आहे. त्याअंतर्गत शिवसेनेच्या प्रभागनिहाय बैठका सुरु आहेत. पिंपरीत रविवारी (दि.3) बैठक झाली. यावेळी माजी आमदार ॲड. चाबुकस्वार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक अनंत को-हाळे, प्रतीक झुंबरे, गुलाब गरुड, माधव मुळे, किशोर केसवानी, सावल तेतलानी, राजाराम कुदळे, अमर कापसे, अनिल पारचा आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चाबुकस्वार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली आपण सक्षमपणे लढत आहोत. माझा विधानसभेला पराभव झाला असला, तरी पराभवाने खचून गेलो नाही. पराभवानंतर तेवढ्याच जोमाने कामाला लागलो आहे. तो पराभव भरुन काढण्याचे काम येत्या महापालिका निवडणुकीत करायचे आहे. शिवसेनेचे जास्तीत-जास्त नगरसेवक महापालिकेत निवडून आणायचे आहेत,असे चाबुकस्वार म्हणाले.

पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून पिंपरी विभागात रखडलेली कामे काही प्रमाणात मी मार्गी लावली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भाजी मंडईचा प्रश्न नगरविकास मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सोडविला आहे. लवकरच इतर विक्रेत्यांना न्याय दिला जाईल.

पिंपरी विभागातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन पार्किंग प्लाझा उभे करण्यात येणार आहेत. मिलिंदनगर मधील राहिलेल्या दोन इमारतीचे कामही मार्गी लावले आहे. त्याचबरोबर भाटनगर येथील पुनर्वसन प्रकल्पाचे काम लवकरच हाती घेतले जाईल. पिंपरी भय, भ्रष्टाचारमुक्त करण्याचे काम पुढील कालावधीत करायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्षम रहावे.

एकसंघ राहून आगामी महापालिका निवडणुका खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे लढायच्या आहेत. महापालिकेत शिवसेनेची ताकद वाढवायची आहे, असेही चाबुकस्वार म्हणाले.

  शिवसैनिकांनी एकत्रपणे येवून पिंपरी विभागात आपली ताकद वाढविण्याची गरज आहे. या भागात अनेक समस्या असून त्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करावे. गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी विभागातील प्रलंबित प्रश्न, व्यापारी वर्गाच्या समस्या दूर करण्याचे काम करायचे आहे.

या समस्यांबाबत महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली होती. भाजी मंडई, पार्किंग व्यवस्था, झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावायची आहे. त्यासाठी महापालिकेत शिवसेनेची सत्ता असणे आवश्यक आहे. मिशन 2022 अभियाना अंतर्गत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.  श्रीरंग बारणे -खासदार, मावळ लोकसभा 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.