Pune News : पुणे मेट्रोमध्ये बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाचा होणार वापर ; संयुक्त सामंजस्य करार संपन्न

एमपीसी न्यूज : पुणे मेट्रोच्या स्थानकांमधील स्वच्छतागृहे, पिण्याचे आणि वापराचे पाणी संवर्धन करण्यासाठी ‘बायोडायजेस्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या संदर्भात करारावर पुणे मेट्रो आणि डी.आर.डी.ओ संस्थांचा सामंजस्य करार संपन्न झाला.

याप्रसंगी अतुल गाडगीळ (संचालक, प्रकल्प) आणि डॉ.डी.के. दुबे (संचालक, डी. आर.डी.इ.) यांच्यामध्ये संयुक्त करारावर स्वाक्षरी करण्यात आली. करारासंबंधीचे दस्तऐवज डॉ. ब्रिजेश दीक्षित (व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो) व डॉ. एच. के. सिंग (डायरेक्टर जनरल डी.आर. डी. ओ. ) यांच्यामध्ये देवाण घेवाण करण्यात आली.

डी.आर.डी.इ आणि डी.आर.डी.ओ. या संस्थांनी बायोडायजेस्टर तंत्रज्ञान विकसित केले आहे. सध्या या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सैन्यदल आणि रेल्वेमध्ये होत आहे. बायोडायजेस्टर तंत्रज्ञान वापरण्यास अत्यंत सुलभ असून त्याला कमीत कमी देखभालीची गरज पडते. या तंत्रज्ञानाचा वापर पुणे मेट्रो स्थानकांवर केला जाणार आहे.

सध्या पुणे मेट्रोचे काम प्रगती पथावर असून आतापर्यंत 47 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोमध्ये वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या 2 मार्गिकेंमध्ये 31 स्थानके आहेत. पुणे मेट्रोच्या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, इन्फॉर्मेशन डिस्प्ले व स्वच्छतागृहे सुविधा उपलब्ध असणार आहेत. पुणे मेट्रोची स्थानके आय.जी.बी.सी. ग्रीन बिल्डिंगच्या मार्गदर्शक तत्त्वाद्वारे बनविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक पर्यावरण संवर्धन तंत्रज्ञानाचा स्टेशन उभारणीत समावेश करण्यात आला आहे.

पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, बायोडायजेस्टर तंत्रज्ञानसंबंधी करारामुळे पुणे मेट्रोला आपली पर्यावरण पूरक बांधिलकी जपण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. पुणे मेट्रो नेहमीच पर्यावरण संवर्धनाची भूमिका घेत आली आहे. झाडांचे पुनर्रोपण, सोलर विद्युत पॅनलचा वापर, मेट्रो स्थानकांमध्ये कमीत कमी विजेचा वापर, बायोडायजेस्टर इत्यादी पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर मेट्रो उभारणीत करण्यात येत आहे. यामुळे पुणे मेट्रोच्या पर्यावरण संवर्धनाच्या संकलपनेला बळ मिळणार आहे. पुणे मेट्रो ही आदर्श पर्यावरण पूरक मेट्रो म्हणून भविष्यात नावारुपाला येईल. त्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.