Pimpri news: सिटी स्कॅनचे दर निश्चित, जादा दर आकारल्यास कारवाई -आयुक्तांचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील डायग्नोस्टीक सेंटरवर सिटी स्कॅन करण्यासाठी अवाजवी बिल आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. राज्य सरकारने कोविड, नॉन कोविड रुग्णासाठी सिटी स्कॅनचे दर निश्चित केले आहेत. त्याचे शहरातील डायग्नोस्टीक सेंटरने पालन करावे. निश्चित केल्या प्रमाणे बिल आकारणी करावी; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

शहरात फेब्रुवारी पासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसगणिक वाढत आहे. परिणामी सिटी स्कॅन करणाऱ्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सिटी स्कॅन करण्यासाठी रुग्णांच्या रांगा लागत असून, वेळही लागत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी सिटी स्कॅन करण्यासाठी डायग्नोस्टीक सेंटर, रुग्णालये जादा दराने पैसे आकारत असल्याचे प्रकार घडले होते.

त्यामुळे सिटी स्कॅनसाठी शासनाने दर निश्चित करून दिले आहेत. 16 स्लाइसपेक्षा कमी सिटी स्कॅनसाठी 2 हजार रुपये, मल्टी डिटेक्टर ( 16 ते 64 स्लाइस) साठी 2 हजार 500 रुपये आणि मल्टी डिटेक्टर (64 स्लाइसच्या पुढे) सिटी स्कॅनसाठी 3 हजार रुपये दर निश्चित केला आहे. या रकमेत सिटी स्कॅन तपासणी, अहवाल सिटी फिल्म, पीपीई किट, डीसाइन्फेकट, सॅनिटायझेशन चार्जेस आणि जीएसटी याचा समावेश आहे.

या दराप्रमाणे बील आकारणी करणे सर्वांना बंधनकारक आहे. सर्व खासगी रुग्णालये, तपासणी केंद्रे यांनी सिटी स्कॅन तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशीनच्या प्रकारानुसार) दर्शनी भागात लावावेत. निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील. निश्चित दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितांवर साथरोग कायदा, 1897 व मेस्मा कायदा 2011 नुसार कारवाई करण्याचा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.