Pimpri News: अवैध बांधकामे गुंठेवारीसाठी नियमित करण्यासाठीच्या कागदपत्रांमध्ये सवलत!

करसंकलन, पाणीपुरवठा विभागाच्या 'एनओसी'ऐवजी दाखल द्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात 31 डिसेंबर 2020 पूर्वी झालेली अवैध बांधकामे नियमित करण्याची किचकट प्रक्रिया महापालिकेने सोपी आणि सुलभ केली आहे. करसंकलन विभागाच्या ना-हरकत दाखल्याऐवजी मालमत्ताधारकांनी मार्च 2021 अखेरचा कराचा भरणा केल्याची पावती, पाणीपुरवठा विभागाच्या ना-हरकत दाखल्याऐवजी मार्च 2021 अखेरचा पाणी बिलाची पावती, जलनि:सारण विभागाच्या ना-हरकत दाखल्याऐवजी मालमत्ताधारकाने ‘ड्रेनेज कनेक्शन पूर्णत्वा’चा दाखला सादर करावा असा बदल केला असल्याची माहिती बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. नागरिकांना ‘एनओसी’साठी महापालिकेच्या विभागात फिरावे लागेल. त्यासाठी या कागदपत्रांमध्ये सवलत दिली असून बाकीची कागदपत्रे जोडावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने राज्यातील महापालिका हद्दीतील 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमात सुधारणा केली आहे. त्याबाबतचा आदेश 18 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केला आहे. त्यानुसार, पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध मालमत्ताधारकांना अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती, अर्जाचे नमुने, आवश्यक कागदपत्रे व गुंठेवारी बांधकामे नियमितीकरणाची सर्वसाधारण माहिती ही महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज नागरी सुविधा केंद्रात स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना ऑनलाइन अर्जही करता येणार आहे. मात्र, 21 फेब्रुवारीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. अशी बांधकामे काढून टाकली जातील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, करसंकलन, पाणी पुरवठा, जलनि:सारण विभागाच्या ना-हरकत (एनओसी) साठी नागरिकांना महापालिकेत फे-या मारावा लागत होत्या. त्यामुळे त्यात बदल केला असून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. करसंकलन विभागाचा ना-हरकत दाखला सादर करण्याऐवजी मालमत्ताधारकांनी मार्च 2021 अखेर मालमत्तेकरिता येणा-या नियमित कराचा भरणा करुन ना-हरकतदाखल्याऐवजी ती पावती सादर करावी. पाणीपुरवठा विभागाच्या ना-हरकत दाखल्याऐवजी मालमत्ताधारकाने मार्च 2021 अखेर मालमत्तेकरिता येणा-या पाणी बिल रकमेचा भरणा करुन ती पावती द्यावी. जलनि:सारण विभागाच्या ना-हरकत दाखल्याऐवजी मालमत्ताधारकाने मालमत्तेसाठी घेतलेल्या ‘ड्रेनेज कनेक्शन पूर्णत्वाचा’ दाखला सादर करावा.

बांधकामे नियमितीकरणासाठी कागदपत्रे

# विहित नमुन्यातील अर्ज
# मालकी हक्कासाठी 7/12 उतारा व तत्सम कागदपत्रे
# मार्च 2021 अखेर मालमत्ता कर भरल्याची पावती
# मार्च 2021 अखेर पाणी बिल भरल्याची पावती
# ‘ड्रेनेज कनेक्शन पूर्णत्वाचा’ दाखला
# इमारतीचा प्लॅन, क्रॉस सेक्शन, इलेव्हेशन, लोकेशन प्लॅन
# नकाशावर मालक व आर्किटेक्टची स्वाक्षरी बंधनकारक
# मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी दाखला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.