Pimpri News: जलपर्णीचे काम थेट पद्धतीने देऊन ठेकेदाराचा आर्थिक फायदा, आयुक्तांची खातेनिहाय चौकशी करा – सरवदे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि अतिरिक्त विकास ढाकणे यांनी पदाचा गैरवापर करत 2 कोटी 29 लाख रूपयांचे इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे कामकाज थेट पद्धतीने ठेकेदाराला दिल्याचा आरोप करत या अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे यांनी केली. चौकशी होईपर्यंत दोनही अधिका-यांना सक्तीच्या रजवेर पाठविण्याचीही मागणीही त्यांनी केली.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. त्यात सरवदे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनागोंदी, ठेकेदार धार्जिणा कारभार सुरु आहे. त्याबद्दल गंभीर तक्रार आपणाकडे करीत आहोत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी पदाचा गैरवापर करत नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम थेटपद्धतीने दिले. 11 मे 2021 पासून 10 लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली राबवण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. परंतु, आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता जुन्याच ठेकेदारांना 2 कोटी 29 लाख रुपयांचे काम थेटपद्धतीने दिले.

या ठेकेदारांच्या कामास मुदतवाढ दिली. परंतु, मुदतवाढ देण्यासाठी कोणतीही अपरिहार्य परिस्थिती उद्भवली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन पूर्णपणे उठवला आहे. देशामध्ये कोणताही महापुर किंवा आणिबाणीची परिस्थिती किंवा युद्ध सदृश्य परिस्थिती नाही.देशातील जनजीवन व आर्थिक व्यवहार सुरळीत चालू असताना मुदतवाढ का देण्यात आली ? शासनाच्या कारभारामध्ये पारदर्शक, परिणामकारक व गतिमान कारभारासाठी 10 लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली लागू केली आहे. परंतु, आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना शासनाच्या नियमावलीचा विसर पडला आहे. ठराविकच ठेकेदारांना आर्थिक फायदा पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त काम करीत असल्याचा आरोप सरवदे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.