Walhekarwadi News: इमारत कोसळण्यापूर्वी दवाखाना ‘शिफ्ट’ करा – नितीन यादव

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी सेक्टर नंबर 32 येथील महापालिकेचा दवाखाना व व्यायामशाळा असलेली इमारत ही धोकादायक झाली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नुसार इमारत धोकादायक आहे. त्यामुळे इमारत कोसळण्यापूर्वी दवाखाना ‘शिफ्ट’ करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली.

याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन दिले आहे. त्यात यादव यांनी म्हटले आहे की, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नुसार महापालिकेचा वाल्हेकरवाडी सेक्टर नंबर 32 येथील दवाखाना व व्यायामशाळा असलेली इमारत ही मानवी वस्तीसाठी अत्यंत असुरक्षित व धोकादायक असल्यामुळे तात्काळ पाडण्यात यावी अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. अडतीस वर्षांपूर्वी म्हणजे 1984 साली बांधलेल्या या इमारतीचे 21 एप्रिल 2016 रोजी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये इमारतीच्या पिलर, बीम, सिमेंट काँक्रीट, स्लॅब, सज्जे व आरसीसी मधील लोखंडी गज यांचे प्रयोगशाळेत भारतीय मानांकनानुसार तपासणी करण्यात आली होती.

तपासणीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. इमारतीमधील सिमेंट काँक्रीटची ताकद पूर्णपणे संपलेली आहे. हेवी लिकेजमुळे लोखंडी सळ्या व तारांना गंज पकडला आहे. भिंतींना व स्लॅबला अनेक ठिकाणी अनेक भेगा व तडे गेले आहेत. इमारतीच्या देखभाली मध्ये प्रचंड दुर्लक्षपणा व गंभीर हलगर्जीपणा केलेला आहे. आरसीसी कॉलम क्रॅक झालेले आहेत, त्यांची ताकद संपली आहे. सज्जे खराब, वाकले आहेत. प्लंबिंग, ड्रेनेज पाईप अनेक ठिकाणी तुटले आहेत. स्वच्छतागृहांमध्ये सर्वत्र पाण्याची गळती लागली आहे. अंतर्गत व बाहेरील प्लॅस्टरची स्थिती अतिशय गंभीर व वाईट आहे. इमारतीवरील स्लॅब अनेक ठिकाणी गळत आहे. भिंतींना भेगा पडल्यामुळे पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरलेले आहे. इमारत अत्यंत धोकादायक झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.