Pimpri News: आयुक्तांच्या ‘त्रिकुटा’त बसत नसल्याने उपायुक्तांचा अवमान; बदल्यांवरुन नगरसेवकांनी सुनावले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्तांच्या मनमानी पद्धतीने बदल्या केल्या आहेत. आयुक्तांच्या ‘त्रिकुटा’त बसत नसल्याने उपायुक्तांचा अवमान केला. सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तांचे काम दिले. हे अतिशय चुकीचे असून सहाय्यक आयुक्तांकडे तीन-तीन विभाग ठेवले. तर, उपायुक्तांना एकच विभाग दिला. उपायुक्तांचे डिमोशन करुन त्यांना अवमान करु नका, असा शब्दांत नगरसेवकांनी आयुक्तांना सुनावले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जानेवारी महिन्याची सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) ऑनलाइन पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रवादीच्या मंगला कदम यांनी उपायुक्तांच्या बदल्यांवरुन आयुक्तांना खडेबोल सुनावले. कदम म्हणाल्या, आयुक्तांनी बदल्या करताना उपायुक्तांचा अवमान केला. सहाय्यक आयुक्तांकडे तीन-तीन विभाग सोपविले. उपायुक्तांचे कामकाज सहाय्यक आयुक्तांना दिले हे अतिशय चुकीचे आहे. इतर उपायुक्त असतानाही सहाय्यक आयुक्तांकडे पदभार दिला. असे करुन उपायुक्तांचे डिमोशन केले आहे. उपायुक्तांचा सन्मान ठेवला जात नाही. आयुक्तांना सहाय्यक आयुक्तांचे काम दिले तर चालेल का?

सुभाष इंगळे यांनी प्रशासनात चांगले काम केले. स्मिता झगडे यांची करसंकलन विभागातील कामगिरी चांगली आहे. त्यांनी महापालिकेच्या महसुलात वाढ केली. मार्च अखेर असून आणखीन महसुल वाढला असता. हे दोन्ही अधिकारी अनुभवी आहेत. त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे. इंगळे यांच्याकडील प्रशासन तर झगडे यांच्याकडील कर आकारणी विभागाची जबाबदारी बदल्यांमध्ये कमी करुन सहाय्यक आयुक्तांकडे हे विभाग दिले आहेत. स्मिता झगडे या महिला अधिकारी आहेत. त्यांच्यावर अन्याय केला असल्याचे कदम म्हणाल्या.

तसेच महापालिकेच्या स्थानिक अधिका-यांवर देखील अन्याय केला जातो. बाहेरुन आलेल्या अधिका-यांकडे क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार दिला जातो. पण, स्थानिक अधिका-यांना दिला जात नाही असेही कदम म्हणाल्या. महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ”बदल्यांबाबतचा आयुक्तांचा निर्णय कोणालाच पटला नाही. बढती द्यावी पण कोणाचे डिमोशन करु नये. अधिका-यांचा अवमान करु नये. बदल्या पूर्ववत करण्याबाबत विचार करावा”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.