Pimpri news: प्लाझ्मा दान करा, दोन हजार रुपये मिळवा !

प्लाझ्मा दात्यांना महापालिका देणार दोन हजारांची प्रोत्साहनात्मक मदत

खासगी रुग्णालयांमधील रुग्णांनाही मिळणार मोफत प्लाझ्मा

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या गंभीर रुग्णाला प्लाझ्मा वरदान ठरत आहे. प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून दात्यांना आवाहन करण्यात येत आहे. या प्लाझ्मा दात्यांना महापालिकेकडून दोन हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक मदत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. खासगी रुग्णालयांमधील रुग्णांनाही मोफत प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सार्वजनिक रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारादरम्यान प्लाझ्माची मागणी वाढली आहे. कोरोना संसर्गाच्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे.

अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी “प्लाझ्मा थेरपी’ कडे एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जात आहे. प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून दात्यांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच, या प्लाझ्मा दात्यांना महापालिकेकडून दोन हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक मदत दिली जाणार आहे.

सध्या खाजगी रुग्णालयांमधील रुग्णांना प्लाझ्मासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये दराने प्लाझ्मा घ्यावा लागत आहे. त्याऐवजी आता महापालिकेच्या रक्तपेढीतून या रुग्णांना मोफत प्लाझ्मा पुरविण्यात येणार आहे. याचा शहरातील गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.

संसर्गाच्या भीतीने रक्तदानाचे प्रमाण कमी झाले असून प्लाझ्मा संकलन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मादान करू शकतात. मात्र पुन्हा संसर्ग होईल या भीतीने प्लाझ्मा दात्यांची संख्या कमी झाली आहे. प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा थेरपीसाठी दाता हवा आहे असे असंख्य फोन आणि मेसेज येत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान मोहीम थंडावते.

शिवाय कोरोना संसर्गामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा फटका प्लाझ्मादानाला बसला आहे. शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आवाहन करूनही प्लाझ्मा देण्यासाठी फारसे लोक पुढे येत नसल्याने मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

हा तुटवडा भरून काढण्यासाठी कोरोनामुक्त व्यक्ती व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी कोरोनावर मात करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.