Pimpri News: निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसाठी ‘ईव्हीएम’ दुरुस्तीचे काम सुरू

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत अनिश्चितता असताना राज्य निवडणूक आयोगाने मतदान यंत्रे (‘ईव्हीएम’) दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या तंत्रज्ञांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मतदान यंत्रे दुरुस्ती करण्याची जागा सुरक्षित असावी. जनसामान्यांच्या संपर्कात नसावी, असे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपआयुक्त अविनाश सणस यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. हे आदेश आज (सोमवारी) पिंपरी महापालिकेला प्राप्त झाले. पिंपरी – चिंचवड महापालिकेकडील 627 कंट्रोल युनिटची पुण्यात दुरुस्ती केली जाणार आहे.  

बृहन्मुंबई,  ठाणे,  उल्हानगर,  कल्याण-डोंबिवली,  मिरा भाईंदर, भिंवडी-निजामपूर, पनवेल, नवी मुंबई,  पुणे,  पिंपरी-चिंचवड, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, कोल्हापूर, नगर, जळगांव, धुळे, मालेगाव, अमरावती, अकोला, लातूर, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर या 23 महापालिकेच्या आयुक्तांना मतदान यंत्रे दुरुस्ती करण्याबाबचे आदेश आयोगाने दिले आहेत. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सर्व मतदान यंत्रांची तपासणी व दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिकांनी मतदान यंत्रे दुरुस्तीकरिता ठरविण्यात आलेल्या महापालिका कार्यालयात आपली मतदान यंत्रे जमा करावीत.

दुरुस्त मतदान यंत्रे पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावीत.इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीकडून तंत्रज्ञ उपलब्ध करुन दिले जातील. या तंत्रज्ञांबाबत माहिती घेण्याकरिता ईएमएसडी प्रभाकर रेड्डी यांच्याशी संपर्क साधावा. महापालिकेकडील कंट्रोल युनिटची संख्या पडताळणी करावी. प्रती कंट्रोल युनिट दोन अंतर्गत बॅटरीज आयोगाच्या कार्यालयातून नेण्याची व्यवस्था करावी. आगामी मोठ्या प्रमाणावरील सार्वत्रिक निवडणुकांचा विचार करता नादुरुस्त कंट्रोल युनिट तसेच बॅलेट युनिटची दुरुस्ती अत्यावश्यक आहे. त्यामुळे दुरुस्ती कार्यक्रम तंत्रज्ञ उपलब्ध होताच काम तत्काळ चालू करावे.

 

महापालिकांनी या तंत्रज्ञांची राहण्याची, स्थानिक प्रवासाची व्यवस्था करावी. दुरुस्ती कार्यक्रम योग्य ठिकाणी आयोजित करावा. सर्व दुरुस्ती एकाच ठिकाणी कराव्यात. दुरुस्तीची जागा सुरक्षित व जनसामान्यांच्या संपर्कातील नसावी. दुरुस्ती कार्यक्रमात ‘क्लॉक यरर’ कंट्रोल युनिटची दुरुस्ती प्राधान्याने करावी. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची नादुरुस्ती देखील तंत्रज्ञांकडून दुरुस्त करुन घ्यावी. नादुरुस्त बॅलेट युनिटची देखील दुरुस्ती करुन घ्यावी.

या सर्व दुरुस्तीचे योग्य अभिलेख तयार करावेत व प्रमाणित करुन आयोगास सादर करावेत. ज्याच्या आधारे आयोगाला ईएलआयएल कंपनीचे देयके अदा करणे शक्य होईल. या मतदान यंत्रे दुरुस्तीसाठी योग्य अधिकारी व कर्मचा-यांची नेमणूक करावी. त्यांचे संपर्क क्रमांक आयोगास द्यावेत. दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आयोगातील शितल चव्हाण यांच्याशी  संपर्क साधवा. तसेच [email protected][email protected] या ईमेलवर संदेश पाठविण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

पिंपरी महापालिकेच्या 627 कंट्रोल युनिटची पुण्यात दुरुस्ती

मुंबई महापालिकेकडे 1 हजार 84 कंट्रोल युनिट व 264 बॅलेट युनिट असून मुंबई पालिकेतच त्याची दुरुस्ती केली जाईल. ठाणे महापालिकेकडे 231 कंट्रोल व 396 बॅलेट युनिट, उल्हासनगर 730 कंट्रोल, 106 बॅलेट युनिट, कल्याण – डोंबिवली 175 कंट्रोल युनिट, भिवंडी – निजामपुर 20 कंट्रोल, 102 बॅलेट युनिट, मीरा भाईंदर महापालिकेकडे 107 कंट्रोल व 32 बॅलेट युनिट आहे. त्याची दुरुस्ती ठाणे महापालिकेत केली जाणार आहे. पनवेल 728 कंट्रोल युनिट, नवी मुंबई पालिकेकडे 53 कंट्रोल व 4 बॅलेट युनिट असून पनवेल महापालिकेत त्याची दुरुस्ती होईल.

पुणे महापालिकेकडे 385 बॅलेट युनिट तर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे 627 कंट्रोल युनिट आहेत. याची तपासणी पुणे महापालिकेकडे होणार आहे.  सांगली – मिरज – कुपवाड 83 कंट्रोल युनिट, सोलापूर 1 हजार 119 कंट्रोल व 2 हजार 282 बॅलेट युनिट, कोल्हापूर 20 कंट्रोल,  20 बॅलेट युनिट असून त्याची दुरुस्ती सोलापूर महापालिकेकडे होणार आहे.

नगर 104 कंट्रोल व 30 बॅलेट युनिट, जळगाव 48 कंट्रोल युनिट, धुळे 250 कंट्रोल, 220 बॅलेट युनिट असून त्याची तपासणी धुळ्यात होणार आहे. मालेगाव महापालिकेकडे 770 बॅलेट युनिट असून तिथेच त्याची दुरुस्ती केली जाईल. अमरावती 37 बॅलेट युनिट, अकोला महापालिकेकडे 46 कंट्रोल, 63 बॅलेट युनिट असून अकोल्यात त्याची दुरुस्ती केली जाईल. लातूर 38 कंट्रोल, 38 बॅलेट युनिट, औरंगाबाद महापालिकेकडे 46 कंट्रोल, 63 बॅलेट युनिट असून लातूरमध्ये दुरुस्ती केली जाईल. नागपूरकडे 134 कंट्रोल, 149 बॅलेट युनिट तर चंद्रपूर महापालिकेकडे 4 कंट्रोल, 35 बॅलेट युनिट असून त्याची दुरुस्ती नागपूर महापालिका हद्दीत केली जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.