Manobodh by Priya Shende Part 20 : मनोबोध भाग 20 – बहू हिंपुटी होईजे माय पोटी

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक वीस.

बहू हिंपुटी होईजे माय पोटी

नको रे मना यातना तेचि मोठी

निरोधे पचे कोंडिले गर्भवासी

अहो मुखरे दुःखात या बाळकासी

तिथे समर्थांनी एका अत्यंत वेगळ्या विषयावर चिंतन केलंय. ते म्हणत आहेत की ” बहू हिंपुटी होईजे माय पोटी, नको रे मना यातना तेचि मोठी “. हिंपुटी ह्याचा अर्थ त्रास, दुःख, कष्ट, अत्यंत दयनीय असा आहे. ज्या आईच्या पोटी गर्भधारणा होते, तिला अत्यंतिक त्रास सहन करावा लागतो. ह्याच्या सारखी मोठी यात्रा ती कोणती?

आधीच्या जन्मात काहीतरी चुकीचे घडलंय, त्याची सुधारणा म्हणून हा पुन्हा एकदा नव्या देहरुपात, नाव रुपात जन्म होतोय, हीच मुळात लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. आधीच्या जन्मात परमेश्वराने दिलेले कार्य पार न पाडता भलतच नको असलेलं कर्म केलंय. काहीतरी लोभ इच्छा-आकांक्षा मनात राहून गेल्याने ती भोगायला मृत्यूनंतर परत एकदा जीव जन्माला येतोय. त्याच्यामुळे त्या मातेला आत्यंतिक त्रास दुःख सोसावा लागतो. आणि ह्या पेक्षा कोणती यात्रा मोठी असेल?

सर्वात जास्त त्रास गर्भधारणेपासून ते बाळ जन्माला येईपर्यंत त्या आईला सहन करावा लागतो. हा त्रास तर आईचा झाला पण त्या गर्भात या जीवाला पण किती यातना सोसाव्या लागतात त्यासाठी समर्थ पुढे म्हणताहेत की “निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख खरे दुःख त्या बाळकासी”

ते बाळ जेव्हा गर्भात असतं, तेव्हा ते सोहम सोहम असं म्हणत असतो. कारण तो परमेश्वराचाच अंश असतो. पण जेव्हा त्याचा जन्म होतो आणि त्याची नाळ कापली जाते तेव्हा, त्याची परमेश्वराशी पण नाळ तुटते. मग तो कोहम कोहम म्हणजे, मी कोण आहे? असं विचारायला लागतो. त्या गर्भाला कोंडून ठेवलं जातं आणि तो अधोमुख म्हणजे, खाली डोकं वर पाय, अशा अवस्थेत नऊ महिने नऊ दिवस तो असतो. निरोध म्हणजे अटकाव किंवा अडकणे आणि पचे म्हणजे उकडून किंवा शिजून निघणे.

त्याच्या जन्मासाठी आणि श्वास घेण्यासाठी अटकाव होऊ नये म्हणून त्याला ही अवस्था भोगावी लागते. अधोमुख जे दुःख त्याला सोसावं लागतं, ही एक प्रकारची दुःख, यातना भोगण्याची शिक्षा असावी, जेणे करून, नवीन रूप धारण केल्यावर तरी सत्कर्म करून, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाऊन, परमात्म्याशी एकरूप होऊन, आता तरी मोक्षाच्या मार्गाने जाऊन, हया जन्म- मृत्यूचा फेरा संपवावा आणि या गर्भाच्या यातनेतून सुटका करून घ्यावी.

समर्थ मनाला सांगत आहेत की, हयावर थोडं चिंतन कर. त्या गर्भाच्या यातना समज. त्या आईच्या यातना समज. त्या बालकाची अवस्था बघ आणि ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून मोक्षाची प्राप्ती कर.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.