Pimpri News: ‘स्पर्श’प्रकरणी माजी महापौर योगेश बहल यांची महापालिकेला नोटीस

बिलापोटी अदा केलेली रक्कम वसूल करावी; संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – स्पर्श हॉस्पिटलच्या भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स मधील कोविड केअर सेंटरला चुकीच्या पद्धतीने तीन कोटी रुपये अदा केले आहेत. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ही रक्कम वसूल करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी नोटीस माजी महापौर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी महापालिकेला पाठविली आहे.

बहल यांनी ॲड. असिम सरोदे यांच्यामार्फत पालिकेला नोटीस पाठविली आहे. स्पर्शप्रकरणी आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी; अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी नोटिशीत दिला.

योगेश बहल यांनी आज (मंगळवारी) कासारवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्पर्शला चुकीच्या पद्धतीने बीले अदा केल्याचे पुराव्यासह त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेविका मंगला कदम, वैशाली काळभोर, नगरसेवक शाम लांडे, मोरेश्वर भोंडवे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप उपस्थित होते.

एकाही रुग्णावर उपचार केले नसताना, कोणताही करारनामा, स्थायी पूर्व परवानगी, आयुक्तांची मान्यता नसताना, लेखा अधिका-यांचे आक्षेप असतानाही स्पर्शला बीले अदा केल्याचा आरोप करत बहल म्हणाले, सत्ताधारी भाजपने कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्यापेक्षा स्वतःच्या आर्थिक फायद्याकडे जास्त लक्ष दिले. भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी प्रशासनातील ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोविड केअर सेंटरच्या नावाखाली 16 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

यामध्ये स्पर्श हॉस्पिटलच्या माध्यमातून तब्बल साडेतेरा कोटींची लूट करण्यात आली आहे. या संस्थेने उभारलेल्या रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स येथिल कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नसताना तसेच स्थायीची मान्यता न घेताच महापालिक प्रशासनाने संस्थेला 3 कोटी 14 लाख 1 हजार 900 रुपयांचे बिल अदा केले आहे.

निविदा प्रक्रियेत गोंधळ, चुकीचा करारनामा, खोटे संचालक दाखविणे असे प्रकार करून संबंधित ठेकेदारांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे नोटिशीत म्हटले आहे.

फॉर्च्यून स्पर्श हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने निविदा भरलेली असताना स्पर्श हॉस्पिटलच्या नावे करारनामा करणे, स्पर्श हॉस्पिटलच्या नावे स्टॅम्प देणे, फॉर्च्यून स्पर्श हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक नसतानाही डॉ. अमोल होळकुंदे यांना सीईओ दाखविणे, त्यांच्यामार्फत महापालिकेसोबत करारनामे करुन महापालिकेची फसवणूक केली आहे.

याला जबाबदार धरुन फॉर्च्यून स्पर्श हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विनोद आडसकर, अमित वाघ, रोहित कणसे, विनय कुमार, राहुल बडे, विकास खुडे या सहा संचालकांसह बोगस दाखविण्यात आलेले सीईओ डॉ. अमोल होळकुंदे यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बहल यांनी केली आहे.

महापालिकेत विविध पक्षाचे नगरसेवक छुप्या पद्धतीने ठेकेदारी करत आहेत. यामध्ये भाजपच्या नगरसेवकांचा मोठा सहभाग आहे. नियमानुसार, नगरसेवक, अधिकारी यांना किंवा त्यांच्या रक्तातील नात्यांमधील कोणाला ठेकेदारी करता येत नाही.

मात्र, या नियमाला फाटा देत हे सर्व सुरू आहे. महापालिकेतील हा प्रकार उघडकीस आणणार असल्याचेही बहल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.