Pimpri News: सामान्य करातील सवलत योजनेस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2021-22 या आर्थिक वर्षातील सामान्य कर सवलत योजनेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करुन सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला 5 लाख 51 हजार 71 मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलांची रक्कम 30 जून पर्यंत आगाऊ भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करात सवलत दिली जाते. त्यामध्ये माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी राहत असलेल्या मालमत्तेस 50 टक्के, महिलांच्या नावे असलेल्या निवासी घरास 50 टक्के, ज्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. त्यांनी मालमत्ता कराचा आगाऊ भरणा केल्यास 10 टक्के तर निवासेत्तरसाठी 5 टक्के सामान्य करात सवलत दिली जाते.

सामान्य करातील सवलत योजनेस 31 जुलैपर्यंत मुदवाढ देण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश: दुकाने, व्यवसाय बंद आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांसह उद्योजक, व्यावसायिक, नागरिक यांना मोठा आर्थिक फटका बसला. नागरिकांचे जीवनमान ठप्प झाले. अनावश्यक बाहेर फिरण्यावर असलेली बंधने याचा विचार करता मालमत्ताधारकांना सामान्यकरातील सवलतींचा लाभ घेता आला नाही. अशा मालमत्ताधारकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने चालू वर्षाच्या सामान्यकरातील सवलत योजनेस 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली असल्याचे उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.