Pimpri News: सायबर हल्यात पाच कोटींचे नुकसान कसे झाले ? : राजू मिसाळ

हल्ल्यानंतर 11 दिवसांनी गुन्हा दाखल केल्याने संशयाचे वातावरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या 27 सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्यात पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार टेक महिंद्रा कंपनीने पोलिसांकडे केली आहे. असे असताना सत्ताधारी नेते एक रुपयांचेही नुकसान झाले नसल्याचे सांगत असून ते चुकीचे काम करणा-यांना पाठिशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला आहे. पाच कोटी रुपयांचे कसे नुकसान झाले ?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

हल्ला झाल्यानंतर 11 दिवसांनी गुन्हा दाखल केल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले असून ही जनतेच्या पैशांची लूट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याबाबत बोलताना मिसाळ म्हणाले, स्मार्ट सिटीच्या निगडीतील अस्तित्व मॉल येथील कार्यालयातील 27 सर्व्हरवर नुकताच सायबर हल्ला झाल्यानंतर सुमारे पाच कोटीचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

यावरून स्मार्ट सिटी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान यंत्रणा सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटीच्या निगडीतील कार्यालयात कंट्रोल आणि कमांड सेंटर निर्माण केले आहे. हा गुन्हा घडल्यानंतर सुमारे 11 दिवसांनी खासगी कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे यामध्ये संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.

टेक महिंद्रा या कंपनीस स्मार्ट सिटीकडील अंदाजे 450 कोटींचे कामकाज देण्यात आलेले आहे. या कामाकाजापैकी 150 कोटी फक्त डेटा सेंटर तयार करण्यासाठी खर्च झाले आहेत. इतका खर्च करूनही सदर डेटा सेंटरमधील डेटा सुरक्षित नाही.

सायबर हल्ला होऊन अंदाजे 12 दिवस उशिराने एफआयआर दाखल करण्याचे प्रयोजन काय ? संबंधित अधिकारी सदर प्रकरण मिटवीत होते का ? तसे न झाल्याने नाईलाजास्तव एफआयआर दाखल करावी लागली आहे.

या प्रकरणी ठेकेदारामार्फत एफआयआर दाखल झाली आहे. महापालिकेच्या अधिका-यांना त्याचे सोयरसुतक नाही का ? त्यांची जबाबदारी आहे की नाही ? सदरचा पैसा जनतेचा आहे.

कररूपी प्राप्त झालेल्या पैशाची उधळपट्टी नाही का ? सर्व्हर तसेच डेटा सुरक्षतेसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्ट इन पॅनल्ड एजन्शी अथवा तत्सम एजन्शी मार्फत तपासणी का करण्यात आली नाही, असे विविध सवाल मिसाळ यांनी उपस्थित केले आहेत.

स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांची चौकशी करा

ठेकेदाराने कामकाज विहीत कालावधीत व योग्य प्रकारे केलेले नसताही अंदाजे 70 टक्क्यांपेक्षा जास्त कामाचे बील संबंधितांना कसे अदा केले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई का करण्यात आली नाही. या प्रकल्पाचे कामकाज दुय्यम प्रतिचे झाले आहे.

त्यामुळे या कामकाजात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण स्वत:वरील जबाबदारी ठेकेदारांवर ढकलत आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, यात नक्कीच हात असल्याचा आरोपही मिसाळ यांनी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.