Pimpri : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत 124 पैकी केवळ 2 ठिकाणी वायफाय

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात 270 ठिकाणी (Pimpri ) वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातील केवळ 124 ठिकाणी वायफाय यंत्रणा जोडण्यात आली आहे. तर महापालिका आणि वायसीएम रूग्णालय या दोनच ठिकाणी प्रत्यक्षात वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. इतर ठिकाणी वायफाय यंत्रणा कार्यान्वित करण्यात स्मार्ट सिटीला अपयश आले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल हिंदुस्थान संकल्पनेतून सर्व शासकीय यंत्रणा डिजिटल स्वरूपात विकसित केल्या जात आहेत. पॅन सिटीअंतर्गत शहरातील नागरिकांना प्रशासकीय कामे करण्यासाठी आणि प्रशासनाला अंतर्गत कामकाज सुकर करण्यासाठी स्मार्ट सिटीने शहरातील 270 ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

या सुविधेमुळे डिजिटल किऑक्‍स, डिजिटल संदेश दर्शविणारे साईन बोर्डस, स्मार्ट मीटर्स, स्मार्ट बिन्स, स्मार्ट पोल्स, स्मार्ट इमर्जन्सी (कॉम्प्युटर एडेड डिस्पॅच) व्हेहिकल्स आणि शहरातील रहिवासी या सर्वांचा समावेश असलेल्या परिसंस्थांना (इकोसिस्टीम) सक्षम करण्यात येणार आहे.

महापालिका मुख्य इमारत, महापालिकेची रुग्णालये, क्षेत्रीय कार्यालये, शाळा, एसटीपी केंद्र यांना सिटी नेटवर्क अंतर्गत निगडीतील इंटिग्रेटेड कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटरला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी वायफाय सुविधा असणे गरजेचे आहे.

Pune : डॉ. संजीव ठाकूर यांची बी.जे. अधिष्ठातापदावरून उचलबांगडी

त्याठिकाणी चालणारे कामकाज कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटरमधून हाताळणे शक्‍य होणार आहे. शिवाय, प्रशासकीय कामकाजासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात, रुग्णालयांमध्ये, शाळांना भेटी देणाऱ्या नागरिकांना वायफाय सुविधेचा लाभ घेऊन ऑनलाइन पद्धतीने प्रशासकीय कामकाज करणे सोयीचे ठरणार आहे. यासाठी सिटी वायफाय अंतर्गत डेटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शहरातील 270 ठिकाणांपैकी 125 ठिकाणी वायफाय नेटवर्क जोडण्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा तत्कालीन महापालिका आयुक्तांनी 2021 मध्येच केला होता. त्यातील केवळ दोनच ठिकाणी वायफाय सुरू करण्यात स्मार्ट सिटीला यश आले आहे. वायसीएम रुग्णालय आणि महापालिका भवनात वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वायफाय डेटा वापरण्याची पद्धत किचकट असल्याचीही ओरड आहे. त्यामुळे म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

वायसीए रुग्णालय आणि महापालिका इमारतीमधील तीन मजल्यावर ही सुविधा आहे. दोन्ही ठिकाणी दिवसाला 1 हजार ते दिड हजार नागरिक सेवेचा लाभ घेत आहेत. यामध्ये नागरिकांना 2 जीबी डेटा वापरण्यासाठी विनाशुल्क देण्यात येत आहे. मात्र, यामध्ये वाढ करून 5 जीबी डेटा देण्याचा विचार असल्याचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी (Pimpri ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.