Pimpri News: अवघ्या 77 दिवसात वेदिकासाठी जमा झाले तब्बल 16 कोटी रुपये

दहा दिवसांत दुर्मिळ लस उपलब्ध होणार; केंद्र सरकार व राज्य सरकारने लसीवरील आयात शुल्क केले माफ

एमपीसी न्यूज – अवघ्या 8 महिन्यांची असताना वेदिकाला SMA Type – 1 या दुर्धर आजाराचे निदान झाले आणि वेदिकाच्या आई- वडिलांच्या पायाखालची जामीनच सरकली. या आजारासाठी देण्यात येणाऱ्या लसीची ( Zolgensma ) किंमत सुमारे 16 कोटी रुपये आणि आयात शुल्क वेगळे. ही लस देण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही असे डॉक्टरांनी सांगून टाकले आणि मग सुरू झाला 16 कोटी रुपये जमा करण्याचा खडतर व अवघड असा प्रवास. पालकांनी नागरिकांना आवाहन केले आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला. अवघ्या 77 दिवसात वेदिकासाठी जमा झाले तब्बल 16 कोटी रुपये.

 

16 कोटी रुपयांची रक्‍कम कुठून आणणार असा प्रश्‍न वेदिकाच्या पालकांसमोर होता. पालकांनी नागरिकांना आवाहन केले आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला. वेदिका अकरा महिन्यांची होण्यापूर्वीच नागरिकांच्या सहाय्याने तब्बल 16 कोटी रुपये जमा झाले. तिच्या पालकांनी केलेल्या विनंतीनुसार केंद्र व राज्यसरकारने देखील आयात शुल्क माफ केले आहे.

आता प्रतीक्षा आहे ती अमेरिकेहून लस येण्याची. कारण लस आल्यानंतरच वेदिकावर उपचार केले जाणार आहेत. यामुळे हजारो नागरिकांची मदत आणि शुभेच्छांच्या बळावर अकरा महिन्यांची चिमुकली वेदिका त्या भीषण आजारावर मात करणार हे नक्की झाले आहे.

या लसीवरील आयात शुल्क माफ करण्याकरिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेत सरकारने आयातशुल्क व कर माफ केल्याची माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली. तर या कामासाठी मराठी अभिनेता निलेश दिवेकर यांचे खूप सहकार्य झाल्याचे शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली वेदिकावर उपचार सुरु आहेत. वेदिकाला आवश्‍यक असलेल्या आर्थिक मदतीची गरज आता पूर्ण झाली आहे. रुग्णालयाच्या वतीने अमेरिकेतील लसनिर्मिती कंपनीकडे लसीची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या दहा ते बारा दिवसांत ही लस रुग्णालयात उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.
त्यानंतर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली वेदिकाला ही लस दिली जाईल.

वेदिकाच्या पालकांनी मानले जनतेचे आभार !

आपल्या सर्वांच्या मदतीमुळे माझ्या चिमुकलीला जीवदान मिळणार आहे. या लसीच्या मदतीने वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊन तिचा पहिला वाढदिवस साजरा करू शकते. आमची तळमळ बघता समाजातील तळागाळातून मदतीचा ओघ सुरू झाला. आपण ही समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून आपापल्या परीने जितकी होईल तितकी मदत समाज माध्यमातून केली गेली या साठी सर्वांचे शतशः आभार..!! अशा भावना वेदिकाचे आई वडील स्नेहा व सौरभ शिंदे यांनी व्यक्त केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.