Pimpri News: ‘पीसीएनटीडीए’चा अविकसित भागही महापालिकेतच समाविष्ट करा’

महापौर, सभागृह नेत्यांची 'सीएम'कडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) अविकसीत भाग ‘पीएमआरडीए’ हद्दीत समाविष्ट करण्यात येवू नये. अविकसित भागही महापालिकेतच समाविष्ट करावा, अशी मागणी महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यात महापौर ढोरे, सभागृह नेते ढाके यांनी म्हटले आहे की, प्राधिकरणाचा विकसित असलेला भाग हा पिंपरी -चिंचवड महापालिकेमध्ये तर अविकसित असलेला भाग हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए) हद्दीत समाविष्ट करण्यासाठी तत्वत: मान्यता दिली आहे.

खरंतर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अगोदरच पिंपरी- चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या तीन संस्था कार्यरत आहेत.

सद्यस्थितीत या संस्थामार्फत शहरामध्ये रस्ते विकसन, निवासी, बिगरनिवासी व औद्योगिक इमारतींना बांधकाम परवानगी देणे, पाणीपुरवठा करणे व शहराचा मुलभूत विकास करणे, इ. विकासकामे केली जातात.

या तीन वेगवेगळ्या संस्थाचे शहराच्या विकासकामावर वेगवेगळे नियंत्रण असल्याने विकास कामांबाबत कोणताही निर्णय घेत असताना वेळोवेळी अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत असतात.

आता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) अविकसित असलेला भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे विकसनासाठी दिल्यास शहराच्या विकास कामांमध्ये आणखी चौथी संस्था निर्माण होईल. त्यामुळे अडचणीमध्ये आणखी भर पडू शकते.

शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या व औद्योगिकरण याचा विचार करुन शहराचे सुयोग्य नियोजन होण्यासाठी, विकास कामात उद्भवणाऱ्या अडचणी वेळीच दूर करण्यासाठी पीसीएनटीडीएच्या विकसित भागाबरोबर अविकसित असलेला भागही पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये वर्ग करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.