Pimpri News : अमृत योजनेतील गैरकारभाराची चौकशी करा : तुषार कामठे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अमृत योजनेत गैरकारभार झाल्याचा आरोप करत त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे. दोषींवर कारवाई करावी; अन्यथा न्यायालयीन लढा लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत नगरसेवक कामठे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. निवेदनाची प्रत प्रधानमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, विभागीय आयुक्तांना पाठविली आहे. निवेदनात म्हटले आहे की, 2018 साली अमृत योजनेमध्ये जलनि:सारण विभागाने 148 कोटींची निविदा प्रसिद्ध केली होती. केंद्र सरकारचे 50 टक्के, राज्य सरकार 30 आणि महापालिकेचा 20 टक्के अशा प्रमाणे खर्च केला जाणार होता.

या निविदेमध्ये एका ठेकेदाराला काम देण्यासाठी निविदा प्रक्रियेपासून वादविवाद चालू होते. रिंग करुन ठेकेदाराला काम दिले. परंतु, काम न होताच ठेकेदाराला बिल अदा केल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा सह शहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, संजय भोसले आणि सल्लागाराची समक्ष भेट घेऊन चर्चा केली. संबंधित कामाचा खर्च ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी झाल्याचे या अधिका-यांकडून सांगण्यात आले.

त्यात 119 कोटी रुपये खर्ची पडले. परंतु, मी प्रतिनिधीत्व करत असलेल्या पिंपळेनिलखमध्ये एक स्केअर फुट सुद्धा काम अमृत योजनेतून झाले नाही. मग, 119 कोटी रुपयांचा खर्च फक्त चिखली भागातच केला का, निविदा बनविताना खर्चाचा अंदाज चुकला की अजून काही याची चौकशी झाली पाहिजे. संबंधित अधिकारी, सल्लागार यांनी अंदाजे 50 किमी ड्रेनेज लाईनला 16 कोटी खर्च होईल, असे सांगितले. तर, 160 किमीला किती खर्च झाला असेल हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही.

पहिला एवढा अनुभव असताना सुद्धा महापालिकेने 6 जून रोजी पुन्हा एकदा 122 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. म्हणजेच एका कामासाठी दोनवेळी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. जे काम 148 कोटीमध्ये व्हायला पाहिजे. ते काम 270 कोटींवर गेले आहे. अशाप्रकारे शहरवासीयांच्या पैशांची लूट होत आहे. ही लूट सहन केली जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी; अन्यथा न्यायालयीन लढा लढावा लागेल, असा इशारा नगरसेवक कामठे यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.