Pimpri News: पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या चुका नागरिकांसमोर मांडण्याचे काम होताना दिसत नाही – विलास लांडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी दिलेली फसवी आश्वासने, सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुका नागरिकांच्या समोर मांडण्याचे काम होणे गरजेचे आहे. ते होताना दिसत नसल्याचे सांगत माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या पालिकेतील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. तर, दुसरीकडे युवकांच्या मदतीने महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. प्रभाग एकचा की दोनचा यावर मतमतांतरे असली तरी प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्थानिक राजकारणात लक्ष घालायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाकडून शहराच्या राजकारणाचा आढावा घेतला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांनी शहराच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी नुकताच दौरा केला. तत्पुर्वी, त्यांनी माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेतली. शहराच्या राजकीय परिस्थितीवर त्यांच्यात चर्चा झाली.

यापूर्वी ज्यांना पदं दिली आहेत, त्यांना कामाचे आदेश देणे, नवीन नियुक्त्या करणे, प्रभाग स्तरावर बुथ कमिट्या तयार करून नवीन कार्यकर्त्यांवर जबाबदारी देणे, आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेऊन झालेल्या चुका टाळून त्यातून पुढे जाण्यासाठी योग्य मार्ग काढणे. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, सत्ताधाऱ्यांनी दिलेली फसवी आश्वासने, सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुका नागरिकांच्या समोर मांडण्याचे काम होणे गरजेचे आहे. ते होताना दिसत नाही.

पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचविण्यासाठी टार्गेट घेऊन काम करणाऱ्या युवकांची फळी तयार केली पाहिजे. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेतल्या पाहिजेत. तरच, आपल्याला येणाऱ्या काळात महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणता येईल, असे लांडे यांनी मेहबुब शेख यांना सूचविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.