Pune News : महिला उद्योजक विकास परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुप्रिया बडवे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – महिला उद्योग विकास संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुणे येथील उद्योजिका सुप्रिया बडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय नूतन अध्यक्षांच्या नियुक्त्यांची नुकतीच घोषणा केली आहे. त्यानुसार बडवे यांची परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी राजश्री पाटील आणि पुणे विभागाच्या अध्यक्षपदी सोनाली सारीपल्ली यांची नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी केली आहे.

बडवे या देशातील प्रथितयश उद्योग समुह बडवे इंजिनिअरिंग ग्रुपच्या संचालक तसेच बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. देशातील विविध औद्योगिक, सामाजिक आणि क्रीडाक्षेत्रातील संस्थांशी सलोख्याचा संबंध असलेल्या उद्योजिका अशी त्यांची ओळख आहे. झारा फ्लॉवर्स, स्पोर्ट्सइंडी, बडवे फिनकॉप, बडवे सन्स, बडवे इन्फ्रा आदी कंपन्यांच्या संचालक म्हणून त्या कार्यरत असून उद्योगक्षेत्रातील त्यांचा अनुभवही प्रदीर्घ आहे.

महिला उद्योग विकास ही संस्था उद्योग, व्यापार व्यवसायातील महिलांसाठी कार्यरत असून महिला उद्योजिकांना एकत्रित करणे, त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शन करणे, जागतिक बाजारपेठेत व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे आदी विषयांवर त्या काम करत असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.

राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना देशातील महिला उद्योजकांना एकत्र करुन त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम राबविणार असल्याचे बडवे यांनी सांगितले. उद्योगांच्या व्यवसायवृद्धी आणि विस्तारासाठी आवश्यक वित्तीय सहाय्य आणि गुंतवणूक, व्हेंचर कॅपिटल व प्रायव्हेट इक्विटी, व्यवसाय सल्लागार सेवा, मार्केटिंग, ब्रँडिंग, नवीन व्यवसाय उपक्रमांची सुरवात, स्टार्ट-अप्स् आणि युवती महिला उद्योजकांना सहाय्य करणे, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, एक्झिबिशन, उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान, अभ्यासदौरे व प्रकल्प भेटी अशा उपक्रमांवर भर देणार असल्याचे बडवे म्हणाल्या.

महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी गोदावरी अर्बन को-ऑप. बँकेच्या चेअरपर्सन राजश्री पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून गेल्या 25 वर्षांपासून महिला बचतगटांची स्थापना, अर्थसाक्षरता शिबिरांच्या माध्यमातून बँकिंग व व्यवहार प्रशिक्षण, व्यवसाय निवड व रोजगार उभारणी आणि मार्केटिंग सारख्या विषयांवर त्या कार्यरत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.