Talegaon News : आदर्श विद्या मंदिरच्या संचालक मंडळातून प्रा. बाळसराफ यांची हकालपट्टी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून वादग्रस्त ठरलेले माजी प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ यांची मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचालित आदर्श विद्या मंदिर या संस्थेच्या संचालक मंडळावरून देखील हकालपट्टी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभय देवकर यांनी केली आहे.

प्रा. बाळसराफ यांच्यावर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती मिळावी यासाठी पोलीस आयुक्तांना तसेच त्यांना शिक्षण संस्थेच्या संचालकपदावरून काढण्याच्या मागणीसाठी आदर्श शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना देवकर यांनी निवेदन दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी देखील देवकर यांच्या मागणीस पाठिंबा दिला आहे. प्रा. बाळसराफ यांना तातडीने पदावरून दूर केले नाही तर जन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अभय देवकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव येथील एका महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत असताना प्रा. बाळसराफ यांच्यावर विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला. याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यानंतर बाळसराफ यांची प्राचार्य पदावरून हकालपट्टी करण्यात आली.

प्रा. बाळसराफ हे अद्याप मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचालित आदर्श विद्या मंदिरच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपावरून वादग्रस्त झालेल्या व्यक्तीला शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर ठेऊ नये. संचालक पदावरून देखील त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी. त्यांच्यापासून संस्थेतील महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना धोका असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.

पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात बाळसराफ यांच्यावर आतापर्यंत दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती मिळण्याची मागणी देखील देवकर यांनी केली आहे. बाळसराफ यांची हकालपट्टी न झाल्यास शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशारा देखील देवकर यांनी दिला आहे.

याप्रकरणी प्रा. दत्तात्रय बाळसराफ यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी आपली एक बैठक सुरू असल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.