Pimpri News: उपमहापौरपदी केशव घोळवे यांची निवड निश्चित

6 नोव्हेंबरला होणार शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून मोरवाडी प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पालिकेत भाजपचे बहूमत असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. यावर 6 नोव्हेंबर 2020 रोजी शिक्कामोर्तब होईल.

उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबर 2020 रोजी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले आहे. त्यासाठी आज (सोमवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. भाजपकडून केशव घोळवे यांनी अर्ज दाखल केला आहे.

महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, प्रियंका बारसे, सुरेश भोईर आदी यावेळी उपस्थित होते.

6 नोव्हेंबर 2020 रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

..असे आहे पक्षीय बलाबल !

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची निविर्विदा सत्ता आहे. त्यामुळे भाजपचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे. भाजपचे तब्बल 76 नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 34, शिवसेना 9, मनसे 1 आणि अपक्ष 5 असे 125 नगरसेवक आहेत. अपक्ष नगरसेवक भाजपशी सलंग्न आहेत.

भाजपचे 77 नगरसेवक होते. पण, दिघीचे लक्ष्मण उंडे यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यामुळे 76 नगरसेवक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगरसेवक होते. चिखलीचे दत्ता साने, आकुर्डीचे जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ घटून 34 झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.