Pimpri News: महापालिका खासगी रुग्णालयांना देणार 35 व्हेंटिलेटर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत गंभीर, अतिगंभीर रुग्णांचा समावेश असून त्यासाठी आवश्यक व्हेंटिलेटर बेड वाढविले जात आहेत. विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) महापालिकेस उपलब्ध झालेले 35 व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयास देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला दोन हजारहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. वाढत्या रुग्णांमध्ये गंभीर, अतिगंभीर रुग्णांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर बेडची मोठी कमतरता जाणवत होती. बेड उपलब्ध नव्हते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने व्हेंटिलेटर बेड वाढविण्यावर भर दिला.

महापालिकेमार्फत वैद्यकीय व्यवस्था व इतर सर्व व्यवस्था पुरविण्याचे काम चालू आहे. सद्यस्थितीत महापालिकेला सीएसआर अंतर्गत 35 व्हेंटिलेटर्स मिळाले आहेत. ते आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, लोकमान्य रुग्णालय (निगडी आणि चिंचवड), स्टार हॉस्पिटल, निरामय रुग्णालय आणि अॅकॉर्ड हॉस्पिटल यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे या खासगी रुग्णालयांची व्हेंटिलेटर क्षमता वाढणार आहे. यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा मिळाला असून, रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे. येत्या दोन दिवसांत हे व्हॅटिलेटर कार्यान्वित केले जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.