Pimpri news: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत 25 लाख नागरिकांचे सर्वेक्षण करणार : महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम आजपासून राबविली जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका दोन टप्प्यात ही मोहीम राबविणार आहे. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2020 दरम्यान पहिला तर दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 दरम्यान असणार आहे. मोहिमेअंतर्गत शहरातील 24 लाख 76 हजार 483 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून 2166 स्वयंसेवकांच्या मदतीने ही मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. या मोहिमेत पालिका सहा ते सात लाख घरांपर्यंत पोहचणार असल्याचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

कोरोनबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभरात आजपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम 15 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2020दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाची आढावा बैठक आज स्थायी समिती सभागृहामध्ये पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, 12 स्वयंसेवक प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून व 12 स्वयंसेवक महिला बचत गटांकडून घेण्याचे नियोजन आहे. स्वयंसेवकांना किमान दहावी पास व स्मार्टफोन वापराचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

यामध्ये मनपा कार्यक्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोमोर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याना तापमान SpO2 तपासणे, Comorbid Condition,ताप खोकला, दम लागणे आदी आजारांबाबतची माहिती घेवून त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनिक मध्ये संदर्भित करण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत शहरातील 24 लाख 76 हजार 483 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 2166 स्वयंसेवकांच्या मदतीने हि मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन आहे.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे कोरोना विषाणूची साखळी तोडून कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल.

कोरोनामुक्त शहर करण्यासाठी शहरातील नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे. कोरोना विषाणूला हरविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम 100% यशस्वी करण्यासाठी दिवसाला किमान 25 घरांना स्वयंसेवकांनी भेटी देणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पथकांची नियुक्ती करावी. काम करण्या-या स्वयंसेवकांना मानधन द्यावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

आमदार महेश लांडगे म्हणाले, या मोहिमेमध्ये सहभागी होणा-या कर्मचा-यांना वाढीव अतिकालीन भत्ता द्यावा. 50 वर्षांपुढील लोकांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करू नये. तसेच काम करण्या-या स्वयंसेवकांना कोरोना योद्धा म्हणून सुरक्षा कवच देण्यात यावे. प्रत्येक पथकामध्ये एक महिला, एक पुरुष स्वयंसेवक व मनपा कर्मचारी असावा.

या बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य विलास मडीगेरी, अभिषेक बारणे, राजेंद्र गावडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.