Pimpri news: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता एक हजाराचा दंड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पालिकेने आता आणखी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. थुंकणे, मास्क न घालण्यासाठीच्या दंडात वाढ केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांकडून आता एक हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. एक हजार रूपयांचा दंड आकारण्यास स्थायी समितीने आज (बुधवारी) मान्यता दिली.

शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 70 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. दिवसाला एक हजार ते 1200 नवीन रुग्ण सापडत आहेत.

थुंकीमधून या विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होतो. थुंकी सुकली नाही, तर पुढील काही तास या थुंकीतले विषाणू जिवंत राहतात आणि आजार बळावण्याची भीती असते.

त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये, असे आवाहन महापालिकेकडून केले जाते. परंतु, नागरिकांकडून त्याचे उल्लंघन केले जात आहे.

त्यासाठी पालिका आरोग्य विभागाकडून धडक कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर अगोदर 150 रुपये दंड आकारला जात होता.

तरी देखील नागरिकांमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यांनतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांकडून 500 रुपये दंड वसूल केला जात होता. तरीही नागरिकांमध्ये कोणताही फरक पडताना दिसत नाही.

आता त्यामध्ये पुन्हा 500 रुपयांनी वाढ केली आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे उद्यापासून थुंकीबहाद्दरांकडून एक हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.