Pimpri News: शहरातील 6 हजार 694 सक्रिय रुग्णांपैकी 7 रुग्ण आयसीयूत तर 3 रुग्ण ऑक्सीजनवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होऊ लागली. मागील दहा दिवसात 7 हजार 77 नवीन रुग्णांची भर पडली. पण, वाढत्या रुग्णसंख्येत लक्षणेविरहित, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. 6 हजार 694 सक्रिय रुग्णांपैकी 6 हजार 269 लक्षणेविरहित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. महापालिका रुग्णालय, सीसीसी सेंटरमध्ये आजमितीला केवळ 425 रुग्ण दाखल असून त्यातील 7 गंभीर रुग्णांवर अतिदक्षता विभाग (आयसीयू) उपचार सुरु आहेत. 3 रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता भासत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च 2020 रोजी राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. चार महिन्यानंतर म्हणजेच सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरली. त्यानंतर पाच महिने रुग्णसंख्या स्थिर राहिली. फेब्रुवारी 2021 च्या मध्यात अचानक रुग्णवाढ सुरु झाली. कोरोनाची दुसरी लाट तीव्र होती. या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. बेडअभावी रुग्णांची धावधाव झाली. ऑक्सीजनचीही कमतरता जाणावत होती. प्रशासनाची मोठी तारांबळ झाली. चार महिन्यानंतर म्गणजेच जून 2021मध्ये दुसरी लाट ओसरली. त्यानंतर सात महिने कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात होती. शहरातील रुग्णसंख्या दोन आकड्यावर आली होती. सर्वात निच्चांकी म्हणजे 18 रुग्ण शहरात सापडले होते. त्यामुळे कोरोना गेला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

नवीन वर्षे 2022 कोरोनाची तिसरी लाट घेऊन आले. वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होऊ लागली. 1 जानेवारी रोजी 112, 2 जानेवारी 175, 3 जानेवारी 149, 4 जानेवारी 350, 5 जानेवारी 590, 6 जानेवारी रोजी 817, 7 जानेवारी रोजी 1 हजार, 8 जानेवारी 1 हजार 73, 9 जानेवारी रोजी 1 हजार 535 आणि 10 जानेवारी रोजी 1 हजार 276 अशा तब्बल 7 हजार 77 नवीन रुग्णांची मागील दहा दिवसात नोंद झाली. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून 31 डिसेंबर रोजी 462 वर असलेली सक्रिया रुग्णांची संख्या 6 हजार 694 वर पोहोचली आहे. त्यातील 6 हजार 269 रुग्ण गृहविलगीकरणात असून 425 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

वाढत्या रुग्णांमध्ये लक्षणेविरहित, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आजमितीला महापालिकेच्या चार रुग्णालयात 58 रुग्ण दाखल असून उर्वरित रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) आहेत. 6 हजार 694 सक्रिय रुग्णांपैकी 7 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभाग (आयसीयू) उपचार सुरु आहेत. तर, 3 रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. या लाटेत रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. मृत्यूदरही कमी असून ही दिलासादायक बाब आहे. रुग्ण वाढत असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.

लक्षणेविहरित, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक – डॉ. गोफणे

वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. लक्षणेविहरित, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. 95 टक्के रुग्ण लक्षणेविरहित असून होम आयसोलेट आहेत. सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार केले जात आहेत. गंभीर रुग्णांचे, मृत्यूचे प्रमाण कमी आहे. महापालिका रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी 7 रुग्ण आयसीयूत तर 3 रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये पण काळजी घ्यावी. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दीत जाणे टाळावे. बाधितांमध्ये लस न घेतलेल्या रुग्णांची प्रमाण सुमारे 80 टक्के आहे. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ लस घ्यावी”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.