Pimpri News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शास्तीकर माफ करा; नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी -चिंचवड शहरातील नागरिकांना शास्तीकर माफ करून दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे केली.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इमारतींवर करसंकलन विभागाकडून करआकारणीचे कामकाज करणेत येते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम 267 अ नुसार शहरातील अवैध बांधकाम करणार्‍या घरगुती इमारतींना सध्या त्यांचे क्षेत्रफळानुसार खालीलप्रमाणे शास्तीकर आकारणेत येत आहे. सध्या 1 हजार चौरस फुटापर्यंतचे निवासी बांधकामाला शास्तीची आकारणी करण्यात येत नाही. 1 हजार ते 2 हजार चौरस फुटापर्यंतचे निवासी बांधकाम प्रतिवर्षी मालमत्ता 50 % दराने शास्ती आकरण्यात येते. 2 हजार चौरस फुटापुढील निवासी बांधकाम प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्ती आकारण्यात येते.

याऐवजी महानगरपालिका हद्दीतील सर्व निवासी बांधकामांना 100 टक्के अवैध बांधकाम शास्तीकर माफ करावा. तसेच सदर मिळकतींना आकरण्यात आलेली अवैध बांधकाम शास्ती ( मिळकतीला अवैध बांधकाम शास्तीकर लागू झालेल्या दिनांकापासून ) सरसकट शासनाच्या मान्यतेने माफ करण्यात यावी असा ठराव 10 जानेवारी 2020 रोजी महापालिका सभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. तथापि, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच बिगरनिवासी व्यावसायिक व औद्योगिक बांधकामधारकांचा कोणताही विचार केलेला नाही.

कोरोना महामारीमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मागील काही कालावधीत मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली असून ही औद्योगिक नागरी असल्याने, त्यामधील कामगारांची संख्या लक्षणीय असून शास्तीकर भरणेही जिकरीचे झालेले आहे. शास्तीकर सरसकट माफ करण्यात यावा. या प्रक्रियेस विलंब होणार असल्यास तत्पूर्वी शास्तीकर बाधित नागरिकांना दिलासा देणेकामी खालीलप्रमाणे शास्तीकर निश्चित करणेत यावा.

सर्व क्षेत्रफळाची निवासी अवैध घरे – शास्तीकर पूर्ण माफ करावा. 1 ते 500 चौरस फुट बिगरनिवासी गाळे – शास्तीकर 25 %, 501 चौरस फुट पुढील बिगरनिवासी गाळे – शास्तीकर 50 %, वरीलप्रमाणे शास्तीकारचे दर निश्चित करून त्याची पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अंमलबजावणी करावी. आवश्यकतेनुसार महाराष्ट्र शासनाचे मार्गदर्शन घेणेत यावे, अशी विनंती वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.