Chinchwad News : खबरदार ! विनमास्क फिराल आणि उघड्यावर थुंकाल तर…

एमपीसी न्यूज – कोरोना आणि कोरोनाचा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनचा फैलाव वाढला आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण आणि कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आणि महापालिका तसेच महापालिका हद्दीच्या बाहेर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांची संयुक्त १६ भरारी पथके नेमण्यात आली आहे.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर नियम घालून दिले आहेत. त्यांचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक आहे. पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची संयुक्त पथके या नियमांची अंमलबजावणी करीत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील यासाठी कंबर कसली आहे. पोलिसांनी पोलीस आणि महापालिका यांची 16 भरारी पथके तयार केली आहेत. ही पथके विनामास्क फिरणारे नागरिक, उघड्यावर थुंकणारे नागरिक, नियमभंग करणा-या आस्थापना यांच्यावर कारवाई करणार आहेत.

अनेकजण प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील मास्क वापरत नाहीत. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. नागरिकांनी नियम पाळले नाहीत, तर संसर्ग आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे मास्क न घालता फिरताना आढळल्यास 500 रुपये दंड तर उघड्यावर थुंकताना आढळल्यास एक हजार रुपये दंड संबंधित व्यक्तीकडून घेण्यात येणार आहे. भरारी पथकामध्ये एक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, महापालिका अधिकारी आणि महापालिका कर्मचारी अशा पाच जणांचे हे पथक असणार आहे. यासोबत स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस देखील कारवाई करणार आहेत.

नागरिकांनी लवकरात लवकर लस घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. मात्र अनेकजण त्याकडे अजूनही कानाडोळा करत आहेत. नागरिकांचे लसीकरण वाढावे यासाठी ज्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत, अशा नागरिकांनाच सार्वजनिक वाहनांमध्ये, हॉटेल, दुकाने आणि इतर ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. बेशिस्त वाहन चालक, नागरिक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच एखाद्या आस्थापनेमध्ये कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होताना आढळून आल्यास त्या आस्थापनांवर देखील कारवाई होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.