Pimpri News: मागणीपेक्षा लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे समस्या, उपलब्धता वाढवण्याची सरकारकडे मागणी – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या 8 केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रासाठी एक ते दीड हजार डोस प्रतिदिन उपलब्ध होत आहेत. मात्र, 10 ते 15 हजार नागरिक एकाच वेळी स्लॉट बुकींगासाठी प्रयत्न करतात. वास्तविक, मागणीपेक्षा लस पुरवठा कमी असल्यामुळे अवघ्या काही मिनिटांत स्लॉट बूक होतात. त्यामुळे नागरिकांनी निराश होवू नये. संयम ठेवावा. लस उपलब्धता वाढवण्यासाठी राज्य सरकारला पत्र दिल्याचे भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

शहरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी सुरू झाली आहे. लसीकरणासाठी नोंदणी बंधनकारक आहे. नाव नोंदणी केल्यानंतर लसीकरण वेळ निश्चित करावी लागते. मात्र, संकेतस्थळावर सर्व स्लॉट काही मिनिटांतच बूक होतात, अशा अनेक तक्रारी सोशल मीडिया, प्रत्यक्ष आणि फोनद्वारे येत आहेत. परिणामी, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत आमदार लांडगे म्हणाले की, लस स्लॉटबाबत सोशल मीडियातून अनेक तक्रारी येत आहेत. सध्या लसीची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. काही दिवसांतच लस पुरवठा नियमित आणि सुरळीत होईल. शहरातील प्रत्येक नागरिकाला लस मिळणार आहे. स्लॉट बुकींसाठी एकाच वेळी हजारो नागरिक प्रयत्न करीत असतात. त्यामुळे काही क्षणात स्लॉट बूक होतात. त्यामुळे चिंता करण्यापेक्षा बुकिंगसाठी संयमाने प्रयत्न करावा, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी. यासाठी महापालिका स्थायी समितीने लस उत्पादक कंपनीकडून थेट पद्धतीने 15 लाख डोस खरेदी करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळावी, यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र दिले आहे. लसीची उपलब्धता वाढवल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.