Pimpri News : कॅम्पातील ‘पी-1, पी-2’ चे निर्बंधही सोमवारपासून शिथिल; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्पात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने पी- 1, पी- 2 प्रमाणे (सम विषम तारखेनुसार) दुकाने सुरु ठेवण्याच्या लावलेल्या निर्बंधामध्ये देखील शिथिलता दिली आहे. सोमवारपासून पी-1, पी-2 बंद केले जाणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली ठेवता येणार असून व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबतची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंधामध्ये आणखी शिथिलता दिली आहे. शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, शनिवार आणि रविवारी ‘विकेंड लॉकडाऊन’ असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

दरम्यान, शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे प्रशासनाने व्यापा-यांवर पी- 1, पी- 2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास निर्बंध घातले होते. हे निर्बंध मागे घेण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात होती.

प्रशासनाने सोमवारपासून विविध निर्बंध शिथिल केले आहेत. पण, त्या नियमावलीत पिंपरी कॅम्पातील पी-1, पी-2 चे निर्बंध हटविण्याबाबतचा उल्लेख नव्हता. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना विचारले असता, कॅम्पातील पी-1, पी-2 ही सोमवारपासून बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे व्यापाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत उघडता येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.