Pimpri News: कोरोना लसीकरणामुळे रिक्षाचा ‘मीटर डाऊन’ उपक्रम लांबणीवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा मीटर प्रमाणे धावण्याला आजपासून सुरुवात केली जाणार होती. परंतु, कोरोना लसीकरण, ग्रामपंचायत निवडणुकीला गेलेला पोलीस बंदोबस्त यामुळे हा उपक्रम लांबणीवर पडला आहे. लवकरच पोलीस आयुक्तांच्या हस्ते रिक्षाचा मीटर डाऊन करून या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे.

मीटरप्रमाणे रिक्षा धावले पाहिजेत, अशी नागरिकांकडून मागणी केली जात होती. या मागणीचा ‘एमपीसी न्यूज’ने पाठपुरावा केला. तसेच शहरातील अन्य सामाजिक संघटनांनीही सातत्याने याबाबतची मागणी लावून धरली होती. त्यानंतर वाहतूक विभागाने रिक्षा संघटनांच्या पदाधिका-यांशी मीटर प्रमाणे प्रवास भाडे आकरण्याच्या विषयावर चर्चा केली.

त्यात रिक्षा संघटना देखील मीटर प्रमाणे प्रवास भाडे आकारण्याची सकारात्मक असल्याचे दिसले. त्यामुळे यावर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने तत्काळ निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून ( शनिवारी ) रिक्षा मीटर प्रमाणे धावणार होत्या. परंतु, कोरोना लसीकरणामुळे हा उपक्रम लांबणीवर पडला आहे.

याबाबत बोलताना रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले, ”रिक्षाचा मीटर डाऊन या उपक्रमाची सुरुवात आज केली जाणार होती. वाहतूक शाखेने आजचा कार्यक्रम ठरविला होता. शहराच्या दृष्टीकोनातून रिक्षाचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे.

त्यामुळे पोलीस, महापालिका आयुक्त आणि आरटीओ अधिका-यांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरु व्हावा, अशी आमची मागणी होती. शहरात आजपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणामुळे येवू शकत नसल्याचे महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. त्यामुळे हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला आहे”.

वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, ”रिक्षाचा मीटर डाऊन उपक्रम नियोजित आहे. शहरात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त देखील आहे. लवकरच रिक्षाचा मीटर डाऊन कार्यक्रम घेण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.