Pimpri News : टोळक्याकडून चप्पल दुकानात दरोडा, दुकानाची तोडफोड; आठ जणांना अटक

एमपीसी न्यूज – आम्ही पिंपरीमधील भाई आहोत, तुला माहिती नाही का? आमच्याकडे पैसे मागतो, असा धमकीवजा सवाल करीत दहा जणांचे टोळके दुकानातून 18 जोडी बूट व चप्पल घेऊन गेले. तसेच, दुकानावर दगडफेक करून तोडफोड केली आणि दुकानाबाहेरील कारवर देखील दगडफेक केली. एमबी शूज, गणेश हॉटेलजवळ, पिंपरी येथे गुरूवारी (दि.24) ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजवरून आठ आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश परशुराम परब (वय 25, रा. सेवा विकास बँकेजवळ, महेशनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून किरण, प्रकाश डोंगरे, सिद्धार्थ गायकवाड, संतोष पवार (सर्व रा, मिलिंद नगर, पिंपरी) यासह इतर सात अनोळखी इसमांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आठ ओरपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण डोंगरे हत्यारासह त्याच्या इतर साथीदारांसोबत फिर्यादी यांच्या चप्पलच्या दुकानात आला. आरोपीने दुकानातून 12 हजार 960 रूपयांचे 18 जोडी बूट व चप्पल खरेदी करण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने घेतले. फिर्यादी यांनी पैशाची विचारणा केली.

आम्ही पिंपरी मधील भाई आहोत, तुला माहिती नाही का ? आमच्याकडे पैसे मागतो,’ अशी धमकी दिली. आरोपी संतोष पवार याने फिर्यादीच्या दंडावर तलवारीने वार करून त्यांना जखमी केले. बाहेर गेल्यानंतर त्यांनी दुकानावर दगडफेक करून दुकानाचे नुकसान केले. दुकानाबाहेरील कारवर देखील दगडफेक केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आठ आरोपींना अटक केली असून, यासंबधी अधिक तपास सुरू आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.