Pimpri news: शहरातील शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार

0

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आणि शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या नसल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार नाहीत. तसेच येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर काढणार आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलॉकमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत येत्या सोमवार (23) पासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याचे नियोजन सरकारने केले होते. मात्र, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने शहरातील परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार मुंबई, पुणे महापालिकेने शाळा चालू न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पिंपरी पालिकेनेही शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर काढणार आहेत.

दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन पालिकेने केले होते. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नववी ते बारावीपर्यंतच्या पालिका, खासगी अशा 282 शाळा आहेत.

त्यात पालिकेच्या नववी ते दहावीच्या 18 आणि 6 उर्दु अशा 24 शाळा असून 4490 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 229 शिक्षक अध्यापनाचे काम करतात.

तर, संपूर्ण शहरात पहिली ते बारावीपर्यंतच्या 658 शाळा आहे. त्यामध्ये नववी ते बारावीच्या वर्गात 92 हजार 842 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या वर्गांसाठी 4 हजार 900 शिक्षक अध्यापनाचे काम करतात.

शिक्षकांची कोरोनाची चाचणी पूर्ण झाली नाही. रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत शहरातील शाळा बंदच राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III