Pimpri News: प्रभागनिहाय मतदार विभाजनाचे काम काटेकोरपणे करा; अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या भारत निवडणूक आयोगाच्या यादीतील प्रभागनिहाय मतदार विभाजनाचे काम नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे आणि दिलेल्या मुदतीत पुर्ण करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिल्या.

महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने मतदार यादी तयार करण्यासाठी आज (शनिवारी) पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदीर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पर्यवेक्षक आणि प्रगणकांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्राधिकृत अधिकारी प्रशांत जोशी, सहाय्यक प्राधिकृत अधिकारी अजय चारठाणकर, विजयकुमार थोरात, रविकिरण घोडके, उमाकांत गायकवाड, अभिजित हराळे, शीतल वाकडे यांच्यासह पर्यवेक्षक आणि प्रगणक उपस्थित होते.

प्रारूप प्रभाग रचनेच्या अनुषंगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजनाचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी सहाय्यक प्राधिकृत अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली महापालिका उपअभियंत्यांना पर्यवेक्षक म्हणुन नेमण्यात आले आहे. तर लिपिक, स्थापत्य सहाय्यक, ग्रंथपाल कम लिपिक, मीटर निरीक्षक आदी कर्मचाऱ्यांकडे प्रगणकाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहा यादी भागाचे काम प्रत्येक प्रगणकाने करायचे आहे.

मतदान यादीतील मतदार पिंपरी चिंचवड महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग नकाशाप्रमाणे कोणत्या निवडणूक प्रभागात समाविष्ट होतो याची निश्चिती केली जाणार आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.