Pimpri News: भाजपच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेली जनता राष्ट्रवादीच्या पाठिशी उभी राहील, 100 हून अधिक नगरसेवक निवडून येतील – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज – भाजपने एकाही आश्वसनाची पूर्तता केली नाही. भाजपने केवळ भ्रष्टाचार, निविदेत रिंग करुन जवळच्या लोकांना ठेके दिले. स्मार्ट सिटीतही लूट सुरु असल्याचा हल्लाबोल करत भाजपच्या भ्रष्ट कारभाराला  कंटाळलेली जनता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी पुन्हा उभी राहील. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.

मावळते शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडून गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाची आज (शनिवारी) सूत्रे स्वीकारली. माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, हनुमंत गावडे, कार्याध्यक्ष जगदिश शेट्टी, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गव्हाणे म्हणाले, शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबाबत पक्षश्रेष्टींचे आभार मानतो. पवारसाहेब, अजितदादांच्या नेतृत्वाखाली शहराचा मोठा विकास झाला. मागील पाच वर्षात भाजपच्या राजवटीत शहराचा विकास खुंटला. भाजपने केवळ भ्रष्टाचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही मतदारसंघात नियोजनबद्ध काम चालू आहे. सर्वजण एकजुटीने, एकदिलाने काम करणार असून राष्ट्रवादीचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येऊन राष्ट्रवादीची सत्ता येईल. याची खात्री आहे. पुढील 50 वर्ष डोळ्यासमोर ठेऊन शहराचा विकास केला जाईल. शहराचा विकास आणि भाजपचा भ्रष्टाचार हे दोन मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही गव्हाणे यांनी सांगितले.

गव्हाणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात शहराचा सर्वांगिन विकास केला. गतवेळी झालेल्या निवडणुकीत आमच्या विरोधात अपप्रचार झाल्याने आम्हाला अपयश पहावे लागले. मात्र यावेळची परिस्थिती बदलली आहे. शहराचा विकास कोण करू शकतो याची खात्री शहरवासीयांना झालेली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता येईल यात कोणतीही शंका नाही. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहराचा वेगवान विकास होत होता. त्या विकासाला भारतीय जनता पक्षाच्या पाच वर्षाच्या काळात खिळ बसली. शहर विकासाची संपूर्ण दिशाच भरकटली आहे. शहराचा विकास पुन्हा रुळावर आणणे आणि राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही गव्हाणे म्हणाले.  शहराच्या विकासाची घडी पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी जनताच राष्ट्रवादीसोबत उभी रहिली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या सत्तेचा अनुभव जनतेने घेतलेला असल्याने भाजपाची महापालिकेतील सद्दी नक्कीच संपुष्टात येईल आणि राष्ट्रवादीची बहुमताने पुन्हा महापालिकेवर सत्ता येईल, असेही गव्हाणे म्हणाले.

गव्हाणे यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह
सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या अजित गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. युवक, सर्वांना सोबत घेऊन जाणारे, शांत, संयमी, मितभाषी नेतृत्व अशी गव्हाणे यांची ओळख आहे. गव्हाणे यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. उत्साहाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.