Pimpri news: कोविडशी लढा सुरू असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार; सत्तारूढ पक्षनेत्यांची टीका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधील ताथवडे गावठाणपासून जीवनमार्ग स. न. 99 ते 100 पुनावळेकडे जाणारा 24 मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी एक वर्षापूर्वी 32 कोटी रुपयांचे काम मंजूर करण्यात आले. परंतु, या रस्त्याची बहुतांश जागा ताब्यात नसल्याने ठेकेदाराला एक वर्षात अवघे 1 कोटी 63 लाखांचे काम करता आले. आता या रस्त्याच्या पुढील कामांसाठी सुमारे 100 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या कामांसाठीदेखील जागा ताब्यात आलेली नाही. तरीही ठेकेदाराला कामाचा आदेश देण्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे. यातून आयुक्तांचाही कचखाऊपणा दिसून येत आहे. कोविडशी लढा सुरू असताना अशा प्रकारचा भोंगळ कारभार करून प्रशासनाला काय मिळवायचे आहे ? असा सवाल सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

प्रभाग क्रमांक 25 मधील ताथवडे गावठाणपासून जीवनमार्ग स. न. 99 ते 100 पुनावळेकडे जाणारा 24 मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी मनपामार्फत व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर इंडीया प्रा. लि. ह्या ठेकेदारास अंदाजे 32 कोटीच्या कामाचे कार्यादेश 18 सप्टेंबर 2019 रोजी देण्यात आले. परंतु, मागील एक वर्षात ठेकेदाराकडून फक्त एक कोटी त्रेसष्ठ लाख रुपयांपर्यंतची कामे करण्यात आली आहेत.

एकीकडे अंदाजे बत्तीस कोटीच्या कामाच्या रस्त्याचे कार्यादेश देऊनही ही जागा ताब्यात नसल्याकारणाने ठेकेदारास फक्त पावणे दोन कोटी रुपयांचे काम करण्यास मुभा मिळाली आहे. तर दुसरीकडे त्याच प्रभाग क्रमांक 25 मधील सदर रस्त्याच्या पुढील कामाचे अंदाजे 100 कोटीची कामे कोविड काळात मंजूर करण्यात आली आहेत.

प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे. एक वर्षापुर्वी कार्यादेश देऊनही सदर ठेकेदाराला रस्त्याचे काम करण्यास भूसंपादन करुन देण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरले आहे. तर, दुसरीकडे त्याच प्रभागातील पुढील रस्त्यावर कोट्यावधी रुपयांची कामे आर्थिक हित साध्य करण्याच्या हेतुने मंजूर केली असल्याची शंका निर्माण होते.

मुळात कामे मंजूर करताना रस्त्याची जागा ताब्यात असल्याचे भासवत अशा पद्धतीने कामे काढली. तर विनाकारण दुसऱ्या प्रभागांमध्ये तरतुद अडवणूक केली जात असल्याचेही लक्षात येत असल्याचे ढाके यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.