Pimpri news: आयुक्तांनी स्वत:च्या नियंत्रणात ‘रेमडेसिवीर’चा पुरवठा करावा- ॲड. सचिन भोसले

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येपुढे महापालिका प्रशासन हतबल; गलथान कारभार उघडकीस

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येपुढे पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासन हतबल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाचा आणि प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. रुग्णांची रोज वाढत जाणारी संख्या पाहता आयुक्तांनी आपल्या अधिकारात एकदम दोनशे ते तीनशे व्हेंटिलेटर खरेदी करावेत. महापालिका हद्दीतील रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्व पुरवठा आयुक्तांनी स्वत:च्या नियंत्रणात घ्यावा आणि कोरोना बाधितांच्या जीविताचे रक्षण करावे. तसेच वैद्यकीय सेवा सुरळीत करावी; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी दिला आहे.

याबाबत ॲड. भोसले यांनी आयुक्त राजेश पाटील यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिले. या पत्रात ॲड. भोसले यांनी म्हटले की, शहरातील कोरोना रुग्ण वाढीचा आकडा रोजच वाढत आहे. मनपाचे सर्व हॉस्पिटल आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रोजच मृत्यूचा आकडा देखिल वाढत आहे.

_MPC_DIR_MPU_II

अनेक रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरत असताना शहरातील सर्व मेडीकल व हॉस्पिटलमध्ये या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी याचा काळाबाजार सुरु आहे. शहरातील रुग्णांच्या गरजेच्या पन्नास टक्केच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत.

महापालिका प्रशासन आणि पदाधिका-यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे आजपर्यंत शहरातील 2249 नागरिकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. बुधवारी (दि. 14 एप्रिल) तर एका दिवसात 45 रुग्णांचा बळी या कोरोनाने घेतला आहे. ही आकडेवारी चिंताजनक असून शहराच्या नावलौकिकास काळीमा फासणारी आहे.

या सर्व बाबींचा विचार करुन आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्या अधिकारात एकदम 200 ते 300 व्हेंटिलेटरची खरेदी करावी आणि मनपाच्या भोसरी (नविन), जिजामाता, आकुर्डी, तालेरा, थेरगांव, सांगवी येथील रुग्णालयात आवश्यक तेवढ्या ऑक्सिजन बेडची आणि व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.