Pimpri News: ‘या’ नऊ नगरसेवकांची पीएमआरडीएवरील निवड ठरली औट घटकेची

पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्यत्व रविवारनंतर होणार रद्द

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या 6 आणि राष्ट्रवादीच्या 3 अशा 9 नगरसेवकांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महानगर नियोजन समितीवरील निवड औट घटकेची ठरली आहे. नगरसेवकपदाचा कार्यकाळ  13 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांचे पीएमआरडीएवरील सदस्यत्वही रद्द होणार आहे. या सदस्यांना केवळ चार महिनेच मिळाले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महानगर नियोजन समितीवर महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत या तीन क्षेत्रातून 30 सदस्यांची निवड 12 नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती. यातील 22 सदस्य पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक आहेत. त्यात पिंपरी महापालिकेतील 9 नगरसेवक आहे. या नगरसेवकांची मुदत 13 मार्च 2022 रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांचे पीएमआरडीएवरील सदस्यत्व रद्द होणार असून निवड ही औट घटकेची ठरली आहे.

महानगर नियोजन समितीवर  निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा ते त्या पदावर असतील तोपर्यंत राहतो, अशी तरतूद नियमावलीत आहे. त्यानुसार पिंपरी  महापालिकेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ हा 13 मार्च 2022 पर्यंत आहे. त्यामुळे या नगरसेवकांचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने त्यांची पीएमआरडीएवरील सदस्यपदही रद्द होणार आहे.

पिंपरी महापालिकेतील भाजपाचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, निर्मला गायकवाड, वसंत बोराटे, जयश्री गावडे तर, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, डॉ. वैशाली घोडेकर हे तिघे असे 9 जण पिंपरीतील नगरसेवक विजयी झाले होते. त्यांची 12 नोव्हेंबर 2021 रोजी पुणे महानगर नियोजन समितीवर सदस्यम्हणून वर्णी लागली होती. त्यांना केवळ चार महिन्यांचा कालावधी मिळाला. रविवारी माजी नगरसेवक झाल्यानंतर त्यांचे  पीएमआरडीएवरील सदस्यपदही रद्द होणार आहे. दरम्यान, भाजपच्या वसंत बोराटे यांनी महिन्यभरापूर्वीच नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.