Pimpri News: सेवानिवृत्त अधिकारी प्रवीण लडकत यांना मुदतवाढ देण्याची आमदार महेश लांडगे यांची मागणी

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत सेवानिवृत्त झाले असून, प्रदीर्घ अनुभव असलेल्या लडकत यांना सेवाकाळात मुदतवाढ द्यावी. तसेच, लडकत यांच्या अनुभवाचा फायदा विविध विभागांना करुन घ्यावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिशय स्वच्छ प्रतिमा असलेला अधिकारी म्हणून ओळख असलेले प्रवीण लडकत आता सेवानिवृत्त झाले आहेत. पुण्यातील प्रतिथयश नूतन मराठी विद्यालय, फर्ग्युसन कॉलेज, सीओईपी अर्थात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून लडकत यांनी शिक्षण घेतले आहे. जून १९९१ साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतुन कनिष्ठ अभियंता व १९९९ मध्ये उप अभियंता म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या लडकत यांनी एप्रिल २०१० रोजी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता व झोनिपूचा अतिरिक्त पदभार सांभाळला आहे. तसेच, डिसेंबर २१ रोजी सह शहर अभियंता या पदावर त्यांची पदोन्नती झाली.

सायन्स पार्क येथे संचालकही म्हणून कार्यरत होते.
शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात आगामी ५० वर्षांचे नियोजन करुन लडकत यांनी विविध प्रकल्प हाती घेतले. त्यामध्ये स्काडा सिस्टीम, JNNURAM योजने अंतर्गत २४ x ७ पाणीपुरवठा, अमृतयोजना अंतर्गत नवीन टाक्यांची निर्मिती करण्यात लडकत यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पमधून पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला पाणी मिळवून देण्यासाठी श्री. लडकत यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शहरातील पाणी, नद्या, पर्यावरण यासंदर्भात गेली २० वर्षे सातत्याने अनेक सामाजिक संस्था-संघटनांशी संबंधित आहेत.

…तर विविध विभागांतील कामाचे नियोजन सोपे होईल!

शहरातील नागरिकांच्या अपेक्षा, गरज ओळखून काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकारी वर्गातील एक असणाऱ्या,  शहरातील सर्व संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करून महापालिका प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांना जोडणाऱ्या अधिकाऱ्याचा अनुभव आणि कौशल्याचा फायदा महापालिका प्रशासनाने करुन घेतला पाहिजे. असा अनुभवी व्यक्ती तज्ञ सल्लागार अथवा संचालक म्हणून विविध प्रकल्पांसाठी कार्यरत राहिल्यास लोकहिताचे ठरणार आहे. शासकीय संस्थांमधील अनेक अभियंत्यांना यापूर्वी सेवाकाळात मुदतवाढ दिली आहे. त्याअनुशंगाने लडकत यांना महापालिका सेवेत मुदतवाढ द्यावी. पाणी व्यवस्थापन, स्मार्ट सिटी, रेन वॉटर हॉर्वेस्टिंग, इनक्युबेशन सेंटर आदी ठिकाणी सल्लागार अथवा संचालकपदी लडकत यांची नियुक्ती केल्यास त्या विभागातील कामांचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.