Pimpri News : झाडांकडे घरातील व्यक्ती या भावनेने पाहिल्यास वृक्षसंवर्धन शक्य – प्रभाकर नाळे

एमपीसी न्यूज – प्रत्येक झाडाकडे घरातील व्यक्ती या भावनेने पाहिल्यास वृक्षसंवर्धन सहज शक्य होईल असे मत नगररचना विभागाचे उपसंचालक प्रभाकर नाळे यांनी व्यक्त केले. पर्यावरण दिनानिमित्त सुदर्शननगर, चिंचवड येथे रविवारी (दि.6) वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी शाळेत बोलत होते.

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि गोलांडे इस्टेट मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, सचिव रवींद्र कुलकर्णी, खजिनदार रवींद्र झेंडे, गोलांडे मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे हरितयुग प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बेडसे, सचिव सागर भोईर यांची उपस्थिती होती.

‘वृक्ष लावणे सोपे आहे, परंतु सातत्याने त्याची जोपासना करणे कठीण काम आहे. सध्याच्या काळात गुळवेल या वनस्पतीचे सत्त्व हे प्रतिकारशक्तीसाठी खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वृक्षारोपण करताना कटाक्षाने औषधीयुक्त, पारंपरिक देशी रोप-वेलींचे रोपण केले पाहिजे. विदेशी झाडांपेक्षा आपल्या पर्यावरणाशी सुसंगत असलेल्या वृक्षांकडे पशू, पक्षी, फुलपाखरे आकर्षित होतात. त्यामुळे जैविक साखळी टिकून राहण्यास मदत होते,’ असे विचार हरितयुग प्रतिष्ठानचे जगदीश घुले यांनी मांडले.

‘पवना, इंद्रायणी या नद्यांचे शुद्धीकरण केल्यास परिसरातील पर्यावरणाचा समतोल साधला जाईल,’ असे राजाभाऊ गोलांडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.