Pimpri News: महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी उल्हास जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांना गुरुवारी (दि.18) काढला आहे. यामुळे स्थानिक अधिकाऱ्याला न्याय मिळाला आहे.

राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले होते. महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत.

त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. विकास ढाकणे आणि अजित पवार हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत. तर, महापालिका सेवेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी असलेले पद प्रवीण तुपे यांच्याकडे दिले होते. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर ते पद रिक्त होते.

प्रशासकीय कामकाजाच्या आवश्यकतेच्या दृष्टीने नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त तीन या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांना विभागाचेही वाटप केले आहे. जगताप यांच्याकडे सर्व क्षेत्रीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग, कायदा, सभाशाखा, आयटीआय मोरवाडी, कासारवाडी, कार्यशाळा विभाग, अभिलेख कक्ष, कामगार कल्याण विभाग, सुरक्षा विभाग आणि माहिती व जनसंपर्क विभागाची जबाबदारी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.