Pimpri News : प्रभागातील साफसफाईची पथकामांर्फत होणार तपासणी

एमपीसी न्यूज – शहर स्वच्छ व सुंदर करावयाचे आहे. यासाठी स्वच्छतेला प्राधान्य देणार असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दररोज प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून, स्वच्छते विषयक तसेच स्थापत्य विषयक कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. साफसफाईच्या कामकाजाचे परीक्षण करण्यासाठी त्याचा नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या. आठ प्रभागांसाठी आठ तपासणी पथक तयार करून साफसफाई कामाबाबत तपासणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

महापालिकेच्या मुख्य प्रशाकीय इमारती मध्ये आयुक्त कक्ष येथे आयोजित आरोग्य व स्थापत्य विषयक विकास कामांबाबत आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.नितीन लांडगे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी के.अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपआपल्या क्षेत्रात पाहणी करून स्थापत्य आणि आरोग्य विभागाशी संबंधित कामे दिवाळी पूर्वी प्राधान्याने पूर्ण करून घ्यावीत. ज्या ठिकाणी शहरात सिमेंटच्या रस्त्याचे काम चालू आहे. तसेच पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या बाजूला स्ट्रॉम वाटर लाईन वर असणारे चेंबर हे रस्त्याच्या उतारा बरोबर समतल नाही. अशा ठिकाणी पावसामुळे चिखल होऊन पाणी साठत असल्याचे निदर्शनास येत आहे. ते नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रस्ता दुरुस्ती संबंधी पॅच वर्क चे कामकाज करत असताना व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

पावसाचे पाणी जाण्यासाठी चेंबर्स खोदलेले आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे सांगून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून दिवाळी पूर्वी कामे पूर्ण करावीत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच अस्वच्छता आढळून येणाऱ्या परिसरातील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.