Pimpri News: राजेंना मंत्रीपद का नाही ?, समर्थकांनी जाब विचारावा : संजय राऊत

एमपीसी न्यूज – केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांना मंत्रीपद मिळाले नाही. एक राजे राष्ट्रपती नियुक्त, तर एक राजे थेट भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. राजेंचे समर्थक मोठे आहेत. राजेंना मंत्रीपद का मिळाले नाही, हा प्रश्न समर्थकांनी प्रधानमंत्र्यांना विचारला पाहिजे, असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

आकुर्डीत पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले, नारायण राणे यांची कारकीर्द उंच आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते. अनेकदा मंत्री होते, ते अनेक पक्षात गेले. ते काँग्रेसमध्ये होते. शिवसेनेत होते. त्यांना शिवसेनेने मुख्यमंत्री केले. त्यांची राजकीय गरुडझेप शिवसेनेतून झाली. इतक्या महान राजकीय परंपरा असलेल्या व्यक्तीला महत्वाचे खाते मिळाले असते तर महाराष्ट्राला आनंद झाला असता. पण, मला खात्री आहे. ते ज्या खात्यात काम करतील, ते खाते उत्तमप्रकारे चालवतील. मंत्री देशासाठी काम करतो. त्यांना देशासमोर प्रगतीपुस्तक दाखवायचे आहे”.

राऊत पुढे म्हणाले, ”केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील राजकारण बिघडविले जात आहे. दहशत निर्माण केली जात आहे. हे फार काळ चालत नाही. या देशात असे अनेक प्रसंग आले आणि गेले. अशा प्रकारची यंत्रणा वापरुन दहशत निर्माण करणा-या नेत्यांचे देशातून नामोनिशान संपले आहे. या सगळ्या तपास यंत्रणा, देशाची ताकद नष्ट करण्याचा प्रकार आहे. सरकार सीबीआय, ईडीची प्रतिष्ठा घालवत आहे, असेही राऊत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.