Pimpri News:  खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला आमदार महेश लांडगे यांचे समर्थन

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच राज्य सरकारने आठ महिन्यांपूर्वी मान्य केलेल्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी. यासाठी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुकारलेल्या उपोषणाला भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी समर्थन दर्शवले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी आज शनिवार पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना  आमदार महेश लांडगे म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करीत आहेत. मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेल्या या लढ्याला पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने माझे समर्थन आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबईत जमा होणार आहेत. मात्र, ज्यांना आझाद मैदानावर जाणे शक्य होणार नाही, अशा बांधवांनी आपआपल्या परीने उपोषणाला समर्थन द्यावे, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले.

मराठा आरक्षण मिळवणे ही आपली प्रमुख मागणी आहे. मात्र, त्यासाठी दीर्घकालीन न्याय प्रक्रिया आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाची आरक्षणापासून होरपळ कमी करावी आणि मान्य केलेल्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी समाजाची मागणी आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाच्या हक्कांसाठी सदनशीर मार्गाने लढा करेल, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या?
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्याची घोषणा सरकारनेच केली होती. मात्र कुणालाही नोकरी दिलेली नाही. याउलट काही वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचे प्रस्तावित केले जात आहे, हे समाजाला मान्य नाही. विशेष बाब म्हणून निर्णय घेऊन सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा.

मराठा आरक्षण मिळवणे, हे आपल्या सर्वांचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी, ती एक दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रमुख मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी व मराठा समाजाची आरक्षणावाचून होणारी होरपळ कमी करावी.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजाणी करण्यास तात्काळ सुरूवात करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रूपये कर्ज व्याज परतावा हा 25 लाख रुपये करण्यात यावा, या मागणीवर सरकारने सकारात्मकता दाखवली होती. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी केलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.