Pimpri news: ‘सह दुय्यम निबंधक कार्यालयात साठेखत व खरेदीखत करण्यास टाळाटाळ’

अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे; ॲड. गणेश थोपटे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अर्धा गुंठा, एक गुंठा, दोन गुंठा, तीन गुंठा अविभक्त हिश्याची तोडून व संपूर्ण क्षेत्राचे साठेखत व खरेदीखताची नोंदणी सरकारने बंद केल्याचे सांगितले जात आहे.  यासंदर्भातील कोणतीही ठोस माहिती सह दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळाली नाही.  तसेच काही ठिकाणी नागरिकांची अडवणूक करून मागच्या दाराने भरमसाट पैसा उकळून खरेदीखत करण्याचे काम संबंधित अधिकारी करत असल्याचा आरोप ॲड. गणेश थोपटे यांनी केला आहे. तसेच विनाकारण थांबलेली प्रक्रिया सुरू करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत ॲड. थोपटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, प्रधान सचिव तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.

त्यात म्हटले आहे की, लॉकडाउनदरम्यान अनेक नागरिकांचे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबले होते. यामध्ये बऱ्याच नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील दुय्यम निबंधक कार्यालय सुरु होताच नागरिकांनी आपल्या खरेदीखताची नोंदणी करण्यास सुरुवात केली.

पण, आता अचानक पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अर्धा गुंठा, एक गुंठा, दोन गुंठा, तीन गुंठा अविभक्त हिश्याची तोडून व संपूर्ण क्षेत्राचे साठेखत व खरेदीखताची नोंदणी शासनाने बंद केलेली आहे असे कळाले. परंतु, यासंदर्भातील कोणतीही ठोस माहिती पिंपरी-चिंचवड शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळाली नाही. उलट यासंदर्भात प्रत्येक नागरिकांना वेगवेगळी तसेच टोलवाटोलवीची उत्तरे ‘एसआरओ’कडून मिळत आहेत.

या त्रासाला कंटाळून नाईलाजास्तव काही नागरीकांना माहितीचा अधिकार वापरून या संदर्भातील माहिती मिळवावी लागत आहे. याबाबत पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक (IGR) तसेच सहा.  जिल्हा निबंधक (JDR) यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.

खरेदीखत बंद असल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच काही ठिकाणी नागरिकांची अडवणूक करून मागच्या दाराने भरमसाठ पैसा उकळून खरेदीखत करण्याचे काम संबंधित अधिकारी करत आहेत. यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे या प्रकरणात जातीने लक्ष घालून विनाकारण थांबवलेली प्रक्रिया त्वरित सुरु करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती ॲड. थोपटे यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.