Pimpri News: जलपर्णी गळ्यात घालून शिवसेना नगरसेवकाचा सभागृहासमोर ठिय्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नदीतील वाढत्या जलपर्णीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी महापालिका सभेच्या मुख्य सभागृहासमोर ठिय्या मांडला.

या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी नदीपात्रातील जलपर्णीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यांना सभागृहात येवू दिले जात नव्हते. त्यामुळे त्यांची सुरक्षारक्षकांसोबत झटापट झाली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (गुरुवारी) आयोजित केली आहे. उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. दरम्यान, जलपर्णी काढायला लावून भोसले यांना सभागृहात येण्याची परवानगी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात पवना, इंद्रायणी या दोन नद्या आहेत. दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदुषण होत आहे. नदीकाठी राहणा-या नागरिकांना दुर्गंधी, डासांचा त्रास होत आहे.

अनेक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महासभेत देखील प्रशासनाला कल्पना दिली होती. परंतु, त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले, असे नगरसेवक भोसले यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.