Pimpri: सभागृह नेतेपदासाठी नितीन लांडगे, नामदेव ढाके, संतोष लोंढे यांच्यात चुरस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन सभागृह नेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौरपदासाठी डावलेले नामदेव ढाके, नितीन लांडगे आणि संतोष लोंढे यांच्यामध्ये चुरस आहे. तर, भाजप धक्कातंत्र राबवत ऐनवेळी वेगळेच नाव देखील पुढे करु शकते, अशीही चर्चा आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि आता मनाने राष्ट्रवादीसोबत असलेले आझम पानसरे यांचा त्यात मोठा वाटा होता. राज्यातही भाजपची सत्ता होती. त्यामुळे प्रदेश नेतृत्वाने शहरात अधिक लक्ष दिले नव्हते. त्यामुळे आमदार बोले तैसे चाले अशी परिस्थिती होती. त्यानुसार आमदारांनी पदांचे अलिखितपणे वाटप करुन घेतले होते.

महापौरपद पहिले अडीच वर्ष भोसरीकरांच्या समर्थकांकडे तर स्थायीचे अध्यक्षपद चिंचवडकरांच्या समर्थकांकडे होते. तर, सभागृह नेतेपद जुने कार्यकर्ते असलेल्या एकनाथ पवार यांच्याकडे होते. पवार यांनी आज अनपेक्षितपणे राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष महेश लांडगे सभागृहनेतेपद आपल्या समर्थकाकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत.

सभागृह नेतेपदासाठी वाल्हेकरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे नामदेव ढाके यांचे नाव आघाडीवर आहे. पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. पहिल्या अडीच वर्षात महापौरपदासाठी ढाके प्रबळ दावेदार होते. परंतु, दोनहीवेळेस त्यांना डावलले. तीनवर्षात एकही पद न मिळालेले भोसरीतील नितीन लांडगे यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्यासाठी शहराध्यक्षांचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे.

तर, स्थायी समिती अध्यक्षपदाला मुकलेले संतोष लोंढे यांची देखील सभागृह नेतेपदी वर्णी लागू शकते. मागील स्थायी समिती अध्यक्ष निवडीवेळी भाजपने धक्कातंत्र राबविले होते. अचानकपणे विलास मडिगेरी यांना अध्यक्षपद दिले होते. त्यानुसार सभागृहनेता निवडीवेळी देखील भाजप धक्कातंत्र राबविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सभागृह नेते पदाची खुर्ची काटेरी!
महापालिकेत सभागृह नेतेपद अत्यंत महत्वाचे आहे. सभागृहाचे कामकाज करुन घेणे. विषय मंजूर करुन घेण्याची कसरत करावी लागते. महापालिका कामकाजावर सभागृहनेत्याचे नियंत्रण असते. जेवढे सभागृहनेते पद महत्वाचे आहे. तेवढेच काटेरीपण आहे. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. यापुढील काळात कारभार तोलून मापून करावा लागणार आहे. महापालिका कारभारावर आरोप होणार नाहीत, याची दक्षता नवीन सभागृह नेत्याला घ्यावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.