Pimpri : महापालिकेचे आरोग्य अधिकारी अन्‌ स्थायी समिती सभापतींमध्ये जोरदार खडाजंगी

कच-याच्या कामाला मान्यता देण्यावरुन झाली खडाजंगी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याच्या कामाच्या कंत्राटदाराला मान्यता देण्यावरुन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय आणि स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. जोराजोरात संभाषण झाल्याने कर्मचारी आवाक झाले होते. दरम्यान, कामाला मान्यता देताना आम्हाला का विचारले नाही?, यावरुन आज, सोमवारी दोघांमध्ये खडाजंगी झाली.

शहरातील कचरा गोळा करण्याचे काम उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना आणि दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदारांना दिले आहे. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी महापालिकेने दोन्ही कंत्राटदारांना कामाची वर्कऑर्डर दिली. तथापि, ठेकेदारांनी अद्याप काम सुरु केले नव्हते. ए.जी. इनव्हायरो या कंत्राटदाराने काम सुरु करण्यास एक महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. तर ‘बीव्हीजी’ इंडिया लिमिटेड या ठेकेदाराने एक एप्रिलपासून काम सुरु करण्याची तयारी दर्शविली होती. काम सुरु करण्यासाठी कंत्राटदारांना अनेक गोष्टींची पूर्तता करायची होती. मनुष्यबळ, वाहनांची संख्या याची माहिती द्यायची होती.

  • ‘बीव्हीजी’ इंडिया लिमिटेड या कंत्राटदाराने माहितीची पूर्तता केली. त्यांची जुन्या कंत्राटाची मुदत 31 मार्चला संपली आहे. त्यामुळे ‘बीव्हीजी’ या कंत्राटदाराने एक एप्रिलपासून नवीन कंत्राटानुसार काम करण्यास तयार असल्याचे पत्र दिले होते. त्यानुसार त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करुन आजपासून काम सुरु करण्यास आरोग्य वैद्यकीय अधिका-यांनी मान्यता दिली. त्यानुसार ‘बीव्हीजी’ने आजपासून कामाला सुरुवात केली आहे. मात्र, काम चालू करण्यास मान्यता देताना आपल्याला का विचारले नाही ? असा प्रश्न स्थायी समितीचे सभापती मडिगेरी यांनी उपस्थित केला.

आरोग्य अधिका-यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कल्पना दिल्याचे सांगितले. त्यावर सभापती मडिगेरी संतापले. आम्ही सत्ताधारी आहोत. आम्हाला सांगायचे. आरोग्य अधिकारी डॉ. रॉय यांनी आपण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करत असून त्यांना कळविले असल्याचे उत्तर दिले. त्यावरुन डॉ. रॉय आणि मडिगेरी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. जोराजोरात संभाषण होत असल्याने कर्मचारी आवाक झाले होते.

याबाबत पत्रकारांशी बोलताना सभापती विलास मडिगेरी म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहराचे विभाजन करुन दोन भागात कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना आणि दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदारांना दिले आहे. दोन्ही कंत्राटदारांना 1 मे रोजी काम सुरु करण्यास मान्यता द्यावी, असा आदेश देण्यात आला होता. तथापि, बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड या कंत्राटदाराला आज काम सुरु करण्यास मान्यता दिली. कामाला मान्यता देताना आम्हाला विचारणे आवश्यक आहे. आम्ही सत्ताधारी आहोत. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांची आयुक्तांकडे तक्रार केली आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.