Pimpri: महापालिकेचा कर संकलन विभाग उद्दिष्टापासून दूर

महापालिकेच्या उत्पन्नवाढीबाबत अधिका-यांमध्ये अनास्था

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कर संकलन विभाग आहे. मात्र, करसंकलन विभाग 2018-19 या आर्थिक वर्षात आपल्या उदिष्टापासून कोसो दूर राहिला आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नवाढीबाबत अधिका-यांमधील अनास्था दिसून आली. दरम्यान, 2018-19 या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाला 525 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. परंतु, विभागाने केवळ 472 कोटी रुपयांचेच कर संकलन केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख सहा हजार 927 मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मिळकत भरण्यासाठी महापालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, महापालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, च-होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे आणि ऑनलाईनद्वारे कराचा भरणा करण्याची सुविधा महापालिकेने करुन दिली आहे. वर्षभर महापालिकेकडून कर संकलन केले जाते.

  • स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) बंद झाल्यानंतर महापालिका मिळकत करावरच अवलंबून आहे. एलबीटीच्या मोबदल्यात राज्य सरकार अनुदान देते. परंतु, अनुदान कमी आहे. त्यामुळे महापालिकेचा एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी अधिक महसूलाची आवश्यकता आहे. कर संकलन हा महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे 100 टक्के कर वसुली होणे अपेक्षित आहे. परंतु, अधिका-यांमध्ये कर वसुली करण्याबाबत अनास्था दिसून येते आहे. मागील आर्थिक वर्षात कर संकलन विभाग उद्दिष्ठ देखील पुर्ण करु शकला नाही.

525 कोटी रुपयांच्या उदिष्टापैंकी विभागाने केवळ 472 कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर सातत्याने 100 टक्के कर वसुलीवर भर देणार, कर बुडवे, कर चुकव्यांवर कारवाई करण्याचा इशारा देतात. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी शुन्य होत असल्याचे मिळकत कर वसुलीवरुन दिसून आले.

  • कर संकलन विभागाची जबाबदारी वादग्रस्त सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे!
    पिंपरी-चिंचवड महापालिकेत साडेतीन वर्षापुर्वी रुजू झाल्यापासून सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर सातत्याने वादग्रस्त राहिले आहेत. विविध कारणांमुळे ते चर्चेत असतात. कर संकलन विभागाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. कर वसुलीची आज माहिती देणे अपेक्षित असताना अष्टीकर यांनी मोबाईल बंद करुन ठेवला आहे. त्यातून महापालिकेच्या उत्पन्न वाढीबाबत त्यांच्यातील अनास्था दिसून आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.