Pimpri: पवना बंदिस्त जलवाहिनी, शास्तीकराबाबत सोमवारी निर्णयाची शक्यता

मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव 'व्हीसी'द्वारे घेणार शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर, पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प आणि महापालिका हद्दीवरील पश्चिमेकडील गावे महापालिकेत समाविष्ट करुन घेण्याबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी ‘व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे’ सोमवारी (दि.4) पिंपरी-चिंचवड शहरातील राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्वांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शहरवासियांना आशा निर्माण झाली आहे.

प्रवीण परदेशी ‘व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे’ सोमवारी (दि.4)दुपारी चार वाजता प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेणार आहेत. यामध्ये महापालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील ‘व्हिडीओ कॉन्फरसिंग’रुममधून भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, मावळचे आमदार बाळा भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणा-या विविध विकासकामांच्या भुमिपुजन, उद्‌घाटनासाठी महिन्याभरापूर्वी शहरात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकराचा प्रश्न आगामी 15 दिवसांत मार्गी लावला जाईल. पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लागण्याबाबत मी स्वतः लक्ष घातले असल्याचे सांगत मावळातील शेतक-यांशी चर्चा करून, त्यांच्या समस्या मार्गी लावून जलवाहिनीचा प्रश्न सामंजस्याने सोडविणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव सोमवारी प्रलंबित प्रश्वांचा आढावा घेणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम 2008 मध्ये सुरु केले होते. प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध करत आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता. यामध्ये तीन शेतकरी शहीद झाले आहेत. आंदोलनानंतर सरकारने प्रकल्पाला स्थगिती दिली आहे.

पवना बंदिस्त जलवाहिनी, अवैध बांधकामावर आकारण्यात आलेला शास्तीकर याची माहिती घेणार आहेत. तसेच गहुंजे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, माण, नेरे, सांगवडे ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आहे. तसेच महापालिकेचा आकृतीबंध, अत्यावश्यक आणि आवश्यक असलेली सरळ सेवेतील रिक्त पदे भरणे, महापालिका विकास योजनेतील प्रस्तावाने बाधीत क्षेत्राचा मोबदाला अदा करणे, एच.ए च्या ताब्यातील अतिरिक्त 59 एकर जमीन बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

महसूल विभागाकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करणे, पुनावळे येथील राखीव घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठीची राखीव जागा, संरक्षण विभागाच्या जागा, महसूल आणि वनविभागाकडून महापालिकेकडे जागा हस्तांतरणाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये तळवडे, दिघी, मोशी, चिखली येथील जागाबाबत चर्चा केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत. त्यामध्ये ताथवडे, निजोजित मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठीची आरक्षित जागा, थेरगाव व ताथवडे येथील 45 मीटर रस्त्याची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.